पुणे : बँकॉकहून अन्नपदार्थांच्या पाकिटामधून तब्बल ३ कोटी ७२ लाख रुपये किमतीचा १०.६४२ किलो हायड्रोपोनिक गांजा पुण्यात आणण्याचा प्रयत्न सीमा शुक्ल (कस्टम) विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने हाणून पाडला. सुकामेवा आणि नूडल्सच्या पाकिटामध्ये दोन थरांच्या काळ्या प्लास्टिकमध्ये व्हॅक्यूम सील करून हा गांजा लपविण्यात आला होता. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४ नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत एका भारतीय प्रवाशाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
बँकॉकहून एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आय एक्स-२९१) विमानाने हा प्रवासी पुणे विमानतळावर दाखल झाला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने त्याच्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या ट्रॉली बॅगेत नूडल्सची पाकिटे आणि“फ्रीज ड्राय मंथोंग ड्युरियन‘ या नावाने असलेल्या सुकामेव्याची नऊ चंदेरी पाकिटे आढळली. प्रथमदर्शनी ही नेहमीची खाद्यपदार्थांची पाकिटे वाटत होती. मात्र, अधिकाऱ्यांनी संशयावरून त्यांची तपासणी केली असता, पाकिटामध्ये काळ्या प्लास्टिकचे दोन थर आणि त्यामध्ये व्हॅक्यूम सील केलेल्या पिशव्या आढळल्या. त्या उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये पिवळसर-हिरव्या रंगाच्या वाळलेल्या फुलांच्या कळ्या आढळल्या. त्यातून उग्र वास येत होता. कस्टम्सच्या अमली पदार्थ तपासणी किटद्वारे चाचणी केली असता, हा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी १०.६४२ किलो गांजा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेले पॅकिंग साहित्य जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत ३ कोटी ७२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तस्करांकडून अन्नपदार्थांच्या पाकिटाचा आडोसा घेऊन अमली पदार्थांची वाहतूक करण्याचा प्रयत्न होत असल्याने विमानतळावरील तपासणी यंत्रणांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कस्टम विभागाचे पोलीस उपायुक्त धीरज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
