पुणे : गेल्या काही तासांपासून सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे विमानतळावरील उड्डाणे विस्कळीत झाली असून, दोन विमानांच्या वेळेत बदल करण्यात आले, तर काही विमान उड्डाणांना उशीर झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
सोमवारी (६ जुलै) सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि दृश्यमानता कमी असल्याने अनेक विमानांच्या येण्याच्या आणि उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आले. आता दुपारपासून हवामानात सुधारणा झाली असून, परिस्थिती पूर्ववत होत असल्याचेही विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्या दोन विमानांना मार्ग बदलावा लागला. ‘इंडिगो एअरलाइन्स’चे चेन्नईहून पुण्याला (६E-५०२) येणारे विमान उशिरा दाखल झाले. तर, ‘इंडिगो’चेच कोलकात्याहून पुण्याला येणारे (६E-१३५) विमान विलंबाने धावत आहे. हे विमान कोलकाताहून निघाल्यानंतर हवामानामुळे हैदराबाद येथे थांबवण्यात आले होते. सध्या या विमानाने हैदराबादहून पुण्याकडे उड्डाण घेतले असून, सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुणे विमानतळावर दाखल होण्याची शक्यता आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तीन ते चार तासांचा उशीर होणार आहे.
‘आकासा एअर’चे देशांतर्गत उड्डाण करणारे एक विमान कार्यप्रणाली निगडित कारणांमुळे रद्द करण्यात आले. याबाबत प्रवाशांना आगाऊ माहिती देऊन, पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, सोमवारी दुपारनंतर पुण्यातील हवामानात हळूहळू सुधारणा होत असून, दृश्यमानता वाढल्याने विमानांच्या उड्डाणांना पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. सध्या तरी कोणतेही हवामान-संबंधित विलंब किंवा मार्ग बदल अपेक्षित नसल्याचेही विमानतळ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
‘विमानतळ टर्मिनलवरील सेवा सुरळीत असल्याचे स्पष्टीकरण’
‘पावसामुळे विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. मात्र, विमानतळ टर्मिनलवरील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. चेक-इन, सामान हाताळणी, सुरक्षा तपासणी आणि प्रवासी सुविधा यांमध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. विमानतळ प्रशासनाने पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत आणि माहिती कक्षाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती,’ अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
‘प्रवाशांसाठी महत्वाची सूचना’
‘हवामान अजूनही बदलत असल्याने प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाइनशी संपर्क साधून उड्डाणाची अद्ययावत स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी घरूनच माहिती घेऊन मगच विमानतळावर यावे,’ असे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
