पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विमानतळावरील अधिकारी विशालकुमार श्रीवास्तव (वय ३०) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी (२९ मे) सकाळी पावणेसातच्या सुमारास गुवाहाटीला जाणाऱ्या विमानाची नियमित तपासणी करण्यात आली. विमानातील प्रसाघनगृहाची तपासणी करण्यात आली.
तेव्हा प्रसाधनगृहात एक चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीवर ठळक अक्षरात बाॅम्ब असे लिहिले हाेते. त्यानंतर त्वरीत सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली.
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तपासणीत विमानातील प्रसाघनृहात बाॅम्बसदृश वस्तू सापडली नाही. या घटनेमुळे गुवाहाटीला जाणाऱ्या विमनास काही काळ विलंब झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलीस उपनिरीक्षक गुंड तपास करत आहेत. यापूर्वी पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर बाॅम्ब ठेवण्यात आल्याचे संदेश पाठविण्यात आले होते. ईमेल, तसेच दूरध्वनीवरुन पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली होती. अशा प्रकारचे कृत्य खोडसाळापणे केल्याचे चौकशीत उघडकीस आले होते.
लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लोणी काळभोर येथील तहसील कार्यालयातील महसूल अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.
हवेली तालुक्यातील हिंगणगाव येथील शेतजमिनीचे सपाटीकरण, विहीर खोदकाम, तसेच पाईपलाईनची परवानगी मिळावी, यासाठी तक्रारदाराने लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयात अर्ज केला. तहसील कार्यालयातील ग्राम महसूल अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने तडजोडीत एक लाख रुपये लाच देण्योाचे मान्य करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या महिन्यात २ एप्रिल रोजी तक्रार केली होती.
या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे तपास करत आहेत.
