Pune Airport new flight schedule May 1: पुणे विमानतळावरून १५ नवीन उड्डाणांना मंजुरी मिळाली असून, महाराष्ट्र दिनापासून (१ मे) सोलापूर, मंगळुरू, बागडोगरासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली. नव्या हवाईमार्गांमुळे देशांतर्गत पर्यटनाबरोबरच स्थानिक बाजारपेठांमधील मागणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही संतोष ढोके यांनी नमूद केले.
विमानतळावर दररोज ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या २२० होती. पुणे विमानतळावरून १५ नवीन उड्डाणांना मंजुरी मिळाल्याने ये-जा करणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ होऊन ती २३५ झाली आहे. उड्डाणांमध्ये वाढ झाल्याने नवीन हवाई मार्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत पुणे विमानतळावरून मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या शहरांसाठी थेट विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे.
सध्या नांदेड, किशनगड, सिंधुदुर्ग आणि जळगाव या चार शहरांसाठी थेट विमान सेवा सुरू आहे. नव्या उड्डाणांसाठी १ मेपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार असल्याचे संतोष ढोके यांनी सांगितले. नवीन हवाई मार्गांमुळे दक्षिण आणि ईशान्य भारताशी पुणे परिसर जोडला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील पर्यटनाबरोबरच स्थानिक बाजारपेठांना मागणी वाढेल, असेही ढोके यांनी नमूद केले.
पुणे विमानतळावरील पायाभूत सुविधांचा विस्तार
‘पुणे विमानतळाच्या नवीन इमारतीमुळे गर्दीचे नियोजन करणे सोयीचे झाले. गरजेनुसार विमानतळावरील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे हवाई उड्डाणांची संख्या वाढविण्यासाठी मंजूरी मिळवता आली. केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत देशांतर्गत हवाई मार्गांचे जाळे विस्तारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच योजनेअंतर्गत पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांची उड्डाणे वाढविण्यात आली. सोलापूर, मंगळुरू, बागडोगरा या नव्या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली.
विमानतळावरील पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत असून, प्रवाशांच्या मागणीनुसार विमान उड्डाणांमध्ये वाढ करण्यात येत आहे,’ असेही संतोष ढोके यांनी स्पष्ट केले. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यानुसार विमान उड्डाणांची संख्या वाढवण्यात येत आहे. आगामी काळात विमानउड्डाणांमध्ये आणखी वाढ करण्याचा विचार असल्याचेही संतोष ढोके यांनी नमूद केले.
विमानसेवेचा विस्तार
उड्डाणांची आताची संख्या – २२०
नवीन उड्डाणांना मंजूरी – १५
१ मेपासून उड्डाणांची संख्या – २३५
