पुणे : ‘पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनल इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत असून, चेक-इन सिक्युरिटी होल्ड एरिया आदी सुविधांचा विस्तार करण्यात येत आहे. नूतनीकरणानंतर पुणे विमानतळावर प्रवासी हाताळणी क्षमता वाढणार असून, तासाला आणखी ४०५ प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दिलासा मिळणार आहे,’ अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

‘प्रवाशांची वाढती संख्या, पीक अवर्समधील गर्दी आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन या जुन्या टर्मिनलचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले असून, आवश्यक प्रक्रियांपैकी बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आता केवळ ‘ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’ची अंतिम परवानगी बाकी असून, ती मिळाल्यानंतर हे नवे विस्तारित टर्मिनल क्षेत्र लवकरच पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे,’ अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

‘नूतनीकरण करण्यात आलेल्या सुविधेचे क्षेत्रफळ ४ हजार ०७५ चौरस मीटर आहे. त्यात चेक-इन, प्री-एम्बार्केशन सिक्युरिटी चेक आणि सिक्युरिटी होल्ड एरिया यांचा समावेश आहे. विस्तारित चेक-इन क्षेत्रात १४ सक्षम चेक-इन काऊंटर उभारण्यात आले आहेत. तसेच, चेक-इन क्षेत्रात इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बोर्डिंगसाठी ६ ए आणि ६ बी अशी दोन बोर्डिंग गेट्स तयार करण्यात आली आहेत. तसेच, व्यावसायिक सुविधांनाही स्थान देण्यात आले आहे. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या पालकांसाठी डायपर चेंजिंग स्टेशन, वॉशरूम, गरम आणि थंड पाण्याची सुविधा असलेली स्वतंत्र बेबी केअर रूम तयार करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी पॉवर सॉकेट्सची सुविधा असलेल्या तीन आसनी खुर्च्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे,’ असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

पुणे विमानतळावरील वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता उपलब्ध पायाभूत सुविधांचा अधिकाधिक प्रभावी वापर करून प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्याच्या दृष्टीने हे नूतनीकरण महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री