Pune Airport News SpiceJet Staff : पुणे विमानतळावरून उड्डाणास उशीर झाल्यानंतर स्पाइसजेटच्या प्रवाशांना दिलेल्या जेवणाच्या दर्जावरून मोठा गोंधळ उडाला आहे. या गोंधळाचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की विमानतळावरील प्रवाशांनी स्पाइसजेटच्या एका कर्मचाऱ्याराला घेराव घातला आहे आणि सर्वजण मिळून त्याच्यावर कंपनीने त्यांना दिलेली बिर्याणी खाण्याची जबरदस्ती करत आहेत. हे जेवण निकृष्ट दर्जाचं आहे असं प्रवाशांचं म्हणणं होतं. मात्र, तीन चमचे बिर्याणी खाल्ल्यानंतर स्पाइसजेट कर्मचारी म्हणाला, “बिर्याणी वाईट नाहीये”. तसेच जेवणाच्या दर्जावरून प्रवाशांनी केलेले आरोप कंपनीने फेटाळले आहेत.
या व्हिडीओमध्ये दिसतंय की संतापलेले प्रवासी स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्याला कंपनीने त्यांना दिलेलं जेवण खाण्यास सांगत आहेत. एक प्रवासी स्पाइसजेट कर्मचाऱ्याला म्हणाला, “हे जेवण तू खा, जेणेकरून आम्हालाही कळेल की हे जेवण जनावरांसाठी आहे की माणसांसाठी. ही बिर्याणी आहे? या भाताला बिर्याणी म्हणायचं? एक प्रवासी म्हणाला, तू विमानतळावर आहेस म्हणून शांत आहे, बाहेर असतास तर मी हे जेवण तुझ्या तोंडात कोंबलं असतं. जनावरांचं जेवण ५० रुपयांमध्ये वाटून लोकांना मुर्ख बनवताय का?
स्पाइसजेटचं म्हणणं काय?

दरम्यान, या व्हिडीओवर स्पाइसजेटने प्रतिक्रिया दिली आहे कंपनीने म्हटलं आहे की “या व्हिडीओबाबत जे दावे केले जात आहेत त्याचं आम्ही खंडण करतो. मुळात हा व्हिडीओ दोन आठवडे जुना आहे. आम्ही प्रवाशांना दिलेलं जेवण ताजं व चांगल्या दर्जाचं होतं. आम्ही एका अधिकृत विक्रेत्याकडून ते खरेदी केलं होतं. हा विक्रेता केवळ आम्हाला जेवण देत नाही. स्पाइसजेटसह विमानतळावरील प्रत्येक विमानातील प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासन अथवा विमान कंपन्या हेच जेवण देतात तसेच विमानतळावर येणारे प्रवासी देखील या विक्रेत्याकडून पाकीटबंद जेवण खरेदी करतात.

कंपनीने म्हटलं आहे की आमचा ग्राउंड स्टाफ त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतो. व्हिडीओमध्ये दिसणारी घटना खूप दुर्दैवी आहे. आमच्या कर्मचाऱ्याबरोबर प्रवाशांनी केलेला व्यवहार, त्याला दिलेली वागणूक अस्वीकारार्ह आहे. प्रवासी त्याच्याशी आक्रमकपणे वागत असले तरी आमचा कर्मचारी विनम्रपणे उत्तरं देत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. आमच्या कर्मचाऱ्यांबरोबर होणारा दुर्वव्यहार व त्यांच्याविरोधातील आक्रमकतेचा आम्ही निषेध करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घटना स्पाइसजेटची फ्लाइट एसजी-८१२४ शी संबंधित आहे. हे विमान पुण्यावरून दिल्लीला जात होतं. मात्र विमानाच्या उड्डाणास तब्बल ७ तास उशीर झाला होता. त्यामुळे प्रवाशी संतापले होते.