पुणे – सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहराने देशाच्या पातळीवर पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. देशातील सर्व विमानतळांमध्ये पुणे विमानतळाने पहिला क्रमांक मिळविला आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने हा पहिला क्रमांक मिळविला आहे.
प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
देशातील सर्व विमानतळांवर ‘एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५’ (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.’
पुणे विमानतळावर नवीन टर्मिनल सुरू झाल्यामुळे पुण्यातून विविध महत्वाच्या शहरांमध्ये जा-ये करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमान उड्डाणांची संख्येतही वाढ झाली आहे. शिवाय प्रवासी सुविधांच्या बाबतीतला दर्जाही सुधारला आहे. देशांतील व्यस्त विमानतळामध्ये पुणे विमानतळाचा समावेश आहे.
दुसरीकडे प्रवाशांना सेवा देण्यामध्ये पुणे विमानतळावर सुधारणा होत आहे. त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होत आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांनादेखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे पुणे विमानतळ प्रशासनाने ‘हमाल सेवा’ पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे हवाई प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर झाला असून, प्रवाशांना याचा फायदा होत आहे.
