पुणे : पुणे विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात ९५ लाखांहून अधिक प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. यात ९३ लाखांहून अधिक प्रवाशांनी देशांर्तगत आणि १ लाख ६९ हजार प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरील देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत १८ टक्के आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत १९.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळनिहाय प्रवासी, उड्डाणे आणि मालवाहतुकीची आकडेवारी जाहीर केली आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२३ या कालावधीतील ही आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरील देशांतर्गत फेऱ्यांची संख्या ६२ हजार ६१६ वर गेली. त्याआधीच्या वर्षात ही संख्या ५८ हजार २६१ होती. त्यात ७.५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याचवेळी देशांतर्गत प्रवाशांची संख्या ९३ लाख ५५ हजार ८५६ वर पोहोचली आहे. त्याआधीच्या वर्षात ही संख्या ७८ लाख ६५ हजार ६४४ होती. त्यात आता १८.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा…माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बाराजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे विमानतळावरून गेल्या वर्षभरात १ हजार ४२३ आंतरराष्ट्रीय फेऱ्या झाल्या. त्याआधीच्या वर्षात ही संख्या १ हजार १९० होती. त्यात १९.६ टक्के वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या गेल्या वर्षी १ लाख ६९ हजार ६२८ वर पोहोचली. त्याआधीच्या वर्षात ती १ लाख ४१ हजार ५१६ होती. यंदा त्यात १९.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

मालवाहतुकीत घट

पुणे विमानतळावरील मालवाहतूक गेल्या वर्षी ३७ हजार ८४१ टन झाली आहे. त्याआधीच्या वर्षात मालवाहतूक ३९ हजार ३६९ होती. त्यात ३.९ टक्के घट नोंदविण्यात आली. पुणे विमानतळावरील देशांतर्गत मालवाहतूक ३७ हजार ८३३ टन आहे. याचवेळी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक केवळ ८ टन आहे. आधीच्या वर्षात ती ५५ टन होती.

हेही वाचा…पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार

पुणे विमानतळावरील हवाई वाहतूक (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४)

देशांतर्गत प्रवासी – ९३ लाख ५५ हजार ८५६

आंतरराष्ट्रीय प्रवासी – १ लाख ६९ हजार ६२८

देशांतर्गत फेऱ्या – ६२ हजार ११६

आंतरराष्ट्रीय फेऱ्या – १ हजार ४२३

देशांतर्गत मालवाहतूक – ३७ हजार ८३३ टन

आंतरराष्ट्रीय मालवाहतूक – ८ टन