पुणे : भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आली. त्यामुळे पुणे विमानतळावरील तब्बल ९९ विमाने एकाच रात्रीत रद्द करण्यात आली. प्रवाशांनी अद्ययावत माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन विमानतळ प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, धावपट्टीवरील विमानाचा अडथळा दूर करण्यात आला असून, शनिवारी (१८ एप्रिल) सकाळी साडेसात वाजता विमानांच्या उड्डाणांना आणि साडेआठ वाजता विमाने उतरवण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली. तर, अपघात झालेल्या विमानातील कर्मचारी सुरक्षित असून, कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला. पुणे विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद झाल्यामुळे येणारी नागरी विमाने हवेतच अडकून पडली होती. इंधनाची मर्यादा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन ही विमाने गुजरातमधील सुरत, गोव्यातील मोपा, नवी मुंबई, चेन्नई आणि कोइंबत्तूर विमानतळाकडे वळवण्यात आली. तर, अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून, विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. १७ आणि १८ एप्रिल दरम्यान इंडिगोची (IndiGo) सर्वाधिक येणारी ३५ आणि जाणारी ३८ विमाने रद्द करण्यात आली. याशिवाय एअर इंडियाची (Air India) ३ येणारी आणि ३ जाणारी, स्पाइस जेटची (Spice Jet) २ येणारी आणि ३ जाणारी आकसा एअरची (Akasa Air) २ येणारी आणि ३ जाणारी, एअर इंडिया एक्सप्रेसची (Air India Express) ५ येणारी आणि ५ जाणारी विमाने रद्द करण्यात आली. सुमारे ९१ विमाने एकाच रात्रीत रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

विमान कंपनी… येणारी विमाने…. जाणारी विमाने… एकूण रद्द झालेली विमाने

इंडिगो… ३५…३८… ७३
एअर इंडिया एक्सप्रेस… ५… ५…१०
एअर इंडिया…३…३…६
स्पाइसजेट… २… ३… ५
आकासा एअर… २… ३… ५

रात्रभर काय काय घडले?

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका लढाऊ विमानाचा धावपट्टीवर उतरताना अपघात झाला. ‘अंडरकॅरेज फेल्युअर’मुळे (विमानाची चाके उघडण्यास तांत्रिक अडथळा) धावपट्टीवर विमानाचा अडथळा निर्माण झाल्याने धावपट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले होते. आता विमानाचा अडथळा दूर करण्यात यश आले असून, दिवसभरात विमानतळावरील वाहतूक पूर्वरत करण्यात येईल, असा दावा पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी केला.

‘हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेमुळे पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. विमानतळावरील वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे स्पष्टीकरण हवाईदलाकडून देण्यात आले.

नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहळ म्हणाले,‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे.’