पुणे : भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आली. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून, कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झाले नसल्याचे हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका लढाऊ विमानाचा धावपट्टीवर उतरताना अपघात झाला. ‘अंडरकॅरेज फेल्युअर’मुळे (विमानाची चाके उघडण्यास तांत्रिक अडथळा) धावपट्टीवर विमानाचा अडथळा निर्माण झाला असून, सध्या धावपट्टीवरील कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले आहे. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टी मोकळी करून विमान वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सुमारे ४ ते ५ तास लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

हवाई दलाचे लढाऊ विमान धावपट्टीवर कोसळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मात्र हवाई दलाकडून अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही. ‘हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेमुळे पुणे विमानतळाची धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. विमानतळावरील वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे स्पष्टीकरण हवाईदलाकडून देण्यात आले आहे.

पुणे विमानतळाची एकमेव धावपट्टी बंद झाल्यामुळे येणारी नागरी विमाने हवेतच अडकून पडली होती. इंधनाची मर्यादा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन ही विमाने गुजरातमधील सुरत, गोव्यातील मोपा, नवी मुंबई, चेन्नई आणि कोइंबत्तूर विमानतळाकडे वळवण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून, विमानतळावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीचे कामकाज सध्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या घडलेल्या घटनेमुळे तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. या संदर्भात सर्व संबंधित विमान कंपन्यांना सूचित करण्यात आले असून, धावपट्टी पूर्ववत करून नियमित सेवा सुरू होण्यासाठी अंदाजे ५ तासांचा कालावधी लागू शकतो. परिस्थिती लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. – मुरलीधर मोहोळ, नागरी हवाई राज्यमंत्री