पुणे : श्रोत्यांच्या हृदयामध्ये अपूर्व स्थान निर्माण केलेल्या आकाशवाणी प्रसारण सेवेची नव्वद वर्षे पूर्ण होत असतानाच आकाशवाणी पुणे केंद्राचा वृत्त विभाग बंद करण्याचा घाट घातला जात आहे. भारतीय माहिती संवा अधिकाऱ्यांचे कायमस्वरूपी पद उपलब्ध नसल्याची सबब पुढे करण्यात आली असून  पुणे येथील प्रादेशिक वृत्त विभागाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात नागरी विमान उड्डाण व सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देऊन यामध्ये लक्ष घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे श्रमिक पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून आकाशवाणी पुणे हे केवळ प्रसारण केंद्र नसून पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग राहिले आहे. सकाळच्या मराठी बातम्या, विश्वासार्ह वृत्तांकन आणि शुद्ध, अभिजात मराठी भाषेचा वापर यामुळे या केंद्राने राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक पिढ्या आकाशवाणीच्या बातम्या ऐकत मोठ्या झाल्या आहेत. आजही सकाळी आकाशवाणीवरील बातम्या ऐकून दिवसाची सुरुवात करणाऱ्या श्रोत्यांची संख्या मोठी आहे. मात्र, भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्यांचे कायमस्वरूपी पद उपलब्ध नसल्याने पुणे येथील प्रादेशिक वृत्त विभागाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये येथील दोन पदे अन्यत्र हलविण्यात आल्यानंतर या विभागाला दोन वेळा बंद करण्याचे प्रयत्न झाले होते.

पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातील विविध स्तरांवरील विरोधामुळे ते निर्णय मागे घेण्यात आले. तीच परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली असून या विभागाच्या भवितव्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या विभागातील एकमेव कायमस्वरूपी वृत्त अधिकारी मनोज क्षीरसागर हे ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर कोणताही कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध राहणार नसल्याने वृत्त विभागाचे कामकाज चालविणे कठीण होणार आहे. त्यामुळे हा विभाग इतरत्र हलविण्याची किंवा बंद करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी आकाशवाणी पुणेने मोठे योगदान दिले आहे. या केंद्रावरील वृत्तसेवा ही केवळ बातम्या देणारी यंत्रणा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला १२ वर्षे पूर्ण होत असताना जनतेपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचविण्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. अशा वेळी पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या आकाशवाणीच्या वृत्तसेवेलाच अस्तित्वाचा धोका निर्माण होणे अत्यंत खेदजनक आहे. हा विभाग बंद होणे म्हणजे केवळ एक प्रशासकीय निर्णय ठरणार नाही, तर पुण्याच्या सांस्कृतिक आणि पत्रकारितेच्या वारशाला धक्का देणारी घटना ठरेल.

पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधील मंत्री म्हणून या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावे, अशी विनंती मुरलीधर मोहोळ यांना सोमवारी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुणे प्रादेशिक वृत्त विभागाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी तातडीने किमान एक भारतीय माहिती सेवा अधिकारी नियुक्त करण्यात यावा. तसेच या विभागाला भविष्यात कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय घ्यावेत, या मागण्यांसह पुणेकरांच्या भावना, मराठी भाषेचा सन्मान आणि विश्वासार्ह वृत्तसेवेची परंपरा जपण्यासाठी आपण सकारात्मक हस्तक्षेप कराल, अशी अपेक्षा पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले यांनी मोहोळ यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.