पुण्याच्या आळंदीत धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.आळंदीच्या साठेनगर परिसरामध्ये हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं असून त्यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात, उद्धव नागनाथ कांबळे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानंतर सुधाकर बाबुराव सूर्यवंशी याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे व्हिडीओमध्ये? या व्हिडीओमध्ये एका घरातील काही व्यक्तींना ख्रिश्चन धर्माविषयीची माहिती देण्यात येत आहे. तसेच, व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलेच्या हातामध्ये एक ताट असून त्यात लाल रंगाचं पाणी असलेले ग्लासही दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लाल पाणी म्हणजे द्राक्षाचं पाणी असून ते येशूचं रक्त म्हणून दिलं जात असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीत साठे नगर वस्तीत आरोपी सुधाकर बाबुराव सूर्यवंशी हा त्याच्या दोन साथीदारांसह काही स्थानिकांना "ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनेने तुमचे आजार बरे करतो, तुम्ही येशूची पूजा करा, तुमच्या आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या दूर होतील, हिंदू धर्म सोडून तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा" असा आग्रह करत असल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. ख्रिश्चन धर्मात येण्यास आग्रह केला गेला म्हणून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.