पुणे : ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) उत्तीर्ण झालेल्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी मंगळवारपासून सुरू केली. या विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या महाराष्ट्र शाखेने बेमुदत संप पुकारला आहे. बुधवारी संपाचा दुसरा दिवस होता. या संपात शासकीय रुग्णालयातील ‘मार्ड’चे डॉक्टरही सहभागी झाले आहेत. त्यामुळे ससून सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्यसेवेवर काही अंशी परिणाम झाला. दरम्यान, ‘आयएमए’च्या पुणे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून संप सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून ‘सीसीएमपी’ प्रमाणपत्रधारक ‘बीएचएमएस’ डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या प्रस्तावाच्या विरोधात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून शांततापूर्ण संप पुकारला. या काळात आपत्कालीन व जीव वाचविणाऱ्या सर्व सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्या. ससून सर्वोपचार रुग्णालयात ‘मार्ड’चे जवळपास साडेचारशे डॉक्टर असून, यांपैकी २० टक्के डॉक्टर निवासी आहेत. जवळपास ८० डॉक्टर सेवेत असून २० टक्के निवासी डॉक्टर पूर्ण वेळ कार्यरत असल्याची माहिती ‘ससून’ प्रशासनाने दिली.
नियमित आणि बिगर-आपत्कालीन वैद्यकीय सेवा तात्पुरत्या स्थगित
अपुऱ्या डॉक्टरांमुळे संपादरम्यान नियमित आणि बिगर-आपत्कालीन वैद्यकीय सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या. मात्र, आपत्कालीन विभाग, आपत्कालीन तसेच जीव वाचविणाऱ्या सर्व सेवा अखंड सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ दिला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. पुढील आंदोलनाबाबत सेंट्रल मार्डच्या मार्गदर्शनानुसार पुढील भूमिका निश्चित करण्यात येईल, असेही निवासी डॉक्टर संघटनेने स्पष्ट केले.
सिटी स्कॅन मशीन बंद
एकीकडे ससून रुग्णालयात ‘मार्ड’ डॉक्टरांनी संप पुकारला असून, दुसरीकडे असुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मंगळवारपासून ससूनमधील सिटी स्कॅन मशीन बंद पडले आहे. यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
कोट
डॉक्टरांचा संप सुरू असला, तरी ससून रुग्णालयात सर्व वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी इतर विभागातील तज्ज्ञ डॉक्टरही कार्यरत आहेत. तसेच, निवासी डॉक्टरही सेवेत रुजू आहेत. त्यामुळे सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, जर संप सुरूच राहिला, तर ससून रुग्णालयाला पर्यायी व्यवस्था करावी लागेल. ससून सर्वोपचार रुग्णालचे अधीक्षक डॉ. यलप्पा जाधव यांनी सांगितले अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची बाजू मांडताना महाराष्ट्र सीसीएमपी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण गायकवाड यांनी सांगितले की सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) उत्तीर्ण झालेल्या ‘बीएचएमएस’ डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याला सुरुवात झाली. पुणे जिल्ह्यात हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे १७०० डॉक्टर आहेत. या प्रमाणपत्रामुळे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणे सुलभ होणार आहे.
संप सुरूच राहणार असल्याची थांब भूमिका मांडत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अलका क्षीरसागर म्हणाल्या की,आम्ही संपावर ठाम असून, हा संप अधिक तीव्र करणार आहोत. यासाठी ‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
संपकाळातील ससूनमधील स्थिती
▪️ ओपीडीतील रुग्णसंख्या १,६२९ वरून १,४४७ पर्यंत घसरली.
▪️ अपघात विभागातील रुग्णसंख्या १८१ वरून ८२ झाली.
▪️ मोठ्या शस्त्रक्रिया ५७ वरून केवळ १६ वर आल्या.
▪️ लहान शस्त्रक्रियांची संख्या १५९ वरून ३३ वर घसरली.
▪️ प्रसूती सेवा सुरू असून १० प्रसूती झाल्या.
▪️ आयसीयू सेवा अबाधित; रुग्णसंख्या ९९ वरून १०८ झाली.
