पुणे : महापालिकेने धरणातील उपलब्ध पाणीसाठा अधिक दिवस वापरता यावा, यासाठी शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. दिवसाआड पाणी देण्यास सुरुवात केल्यानंतर तीन दिवसांतच महापालिकेकडे ५९३ तक्रारी आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या मध्यवर्ती पेठांच्या भागातून आल्या आहेत.

महापालिकेकडे तीन दिवसांत आलेल्या एकूम तक्रारींपैकी २३७ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. उर्वरित भागांतील तक्रारी सोडविण्यात येत आहेत. तसेच, टँकरने पाणीपुरवठा करताना अंतर कमी करण्यासाठी नव्याने टँकर पॉइंट सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली.

तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाणी उशिरा व कमी दाबाने येत आहे, वेळेपूर्वीच पाणी जाते, ठरवून दिलेल्या दिवशी येत नाही, अशा तक्रारींचा समावेश आहे. ‘ज्या ठिकाणावरून या तक्रारी येत आहेत. तेथे तपासणी करून काही ठिकाणी वेळ वाढवून देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. पूर्वी टँकरच्या १ हजार ४०० फेऱ्या व्हायच्या. यामध्ये आता शंभरने भर पडली आहे,’ असे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याबाबत कोथरूड, बाणेर, बालेवाडी परिसरातील तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. हडपसर, काळेपडळ, शांतीनगर, महंमदवाडी, सय्यदनगर, केशवनगर आणि खराडीच्या काही भागांत तक्रारी आहेत, त्या लवकरच सोडवण्यात येतील. दत्तवाडी परिसरातून कमी दाबाने पुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत्या. आयुक्त नवल किशोर राम यांनी या भागात भेट देऊन पाहणी केली. तसेच, नेहमी कमी दाबाने आणि अशुद्ध पाणी पुरवठा होत असलेल्या भागातील कामे करण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले.

नवीन टँकर पॉईंट सुरू करणार

उंड्री, पिसोळी परिसरात पद्मावती येथील टँकर पॉइंटवरून पाणीपुरवठा होतो. हे अंतर कमी करण्यासाठी उंड्री परिसरात अमेनिटी स्पेस ताब्यात घेऊन टँकर पॉइंट सुरू करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरासाठी तीन टीएमसी पाणी

शहराला दैनंदिन पाणीपुरवठा करण्यासाठी १ हजार ६०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. यंदा पाऊस उशिराने सुरू होणार असून, पर्जन्यमान कमी होणार असल्याचा अंदाज असल्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा जुलैऐवजी ३१ ऑगस्ट अखेरपर्यंत राखीव ठेवण्याची सूचना राज्य सरकारने महापालिकेला केली आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी तीन टीएमसी पाणी शहरासाठी मिळणार आहे. मात्र, पाऊस उशिरा सुरू होणार असल्याबरोबरच तो कमी होणार असल्यामुळे पाणीकपात करण्यात आली आहे.