दासनवमी उत्सवाची ९९ वर्षांची परंपरा राखत दर्जेदार व्याख्याते, कीर्तनकार यांच्या सहकार्याने यंदा शंभरावा उत्सव आनंदाश्रमात साजरा केला जाणारा आहे. २ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजक नंदू कुलकर्णी यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

दासनवमी उत्सव कोणी सुरू केला?

नूतन मराठी शाळेतील नामवंत शिक्षक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक न. म. कुलकर्णी म्हणजेच माझ्या वडिलांनी हा उत्सव त्यांच्या वयाच्या २२ व्या वर्षी सुरू केला. ते अक्षर गुरुजी, तसेच नामानंद रामदासी म्हणूनही प्रसिद्ध होते. १९९८ मध्ये त्यांचे निधन झाले. तोपर्यंत म्हणजे तब्बल ७२ वर्षे त्यांनी मोठ्या निष्ठेने आणि व्रतस्थपणे हा उत्सव पार पाडला. त्यांचा संत वाङ्मयाचा दांडगा अभ्यास होता. ते स्वतः कीर्तनकार होते. हिंदी आणि मराठीतून उत्तम कीर्तन करायचे. त्यांच्या पश्चात डॉ. स. म. परळीकर आणि ॲड. पु. वि. डावरे यांनी या उत्सवाची धुरा सांभाळली. तेव्हापासून बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. शाळेशेजारील आनंदाश्रमात हा उत्सव होतो. पूर्वी उत्सवात नऊ दिवस संपूर्ण दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. त्यामध्ये दासबोध पारायण, उपासना, भजन, संगीताचा कार्यक्रम, कीर्तन आणि व्याख्यान असे कार्यक्रम व्हायचे. मंदिरातील मंडपात गर्दी झाल्यास खाली अंगणात बसून श्रोते कार्यक्रम ऐकायचे. कीर्तन आणि व्याख्यान हे या उत्सवाचे अविभाज्य अंग होते. हीच कीर्तन, व्याख्यानाची परंपरा आम्ही इतकी वर्षे कायम राखली आहे.

हा उत्सव पुढे सुरू ठेवण्यासाठी कसे नियोजन केलेत?

या उत्सवाची जबाबदारी गेली २५ वर्षे म्हणजेच २००० पासून नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सांभाळतो आहे. वडिलांच्या वेळी जसा हा उत्सव चालायचा, तसाच पुढेही व्हावा यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले. मित्रमंडळीही मदतीला आली. पूर्वी पाचशेहून जास्त श्रोते या उत्सवासाठी येत असत. त्या वेळी आनंदाश्रमातील शिवमंदिरात हा उत्सव होत असे. वाढत्या शहरीकरणामुळे आता पूर्वीसारखे पाचशे श्रोते येण्याची शक्यता नसली, तरी साधारणपणे शंभरच्या आसपास श्रोते येतात. जे येतात, ते अगदी मनापासून आणि केवळ श्रवणानंदासाठी येतात. पूर्वी दिवसभर कार्यक्रम असायचे, आता सकाळी पारायण, दुपारी कीर्तन आणि संध्याकाळी व्याख्यान असा कार्यक्रम आयोजित केला जातो.

कार्यक्रमांचे स्वरूप काय असते?

दासमवमीच्या संध्याकाळी सुप्रसिद्ध गायिका मंजिरी आलेगावकर गेली २५ वर्षे स्वेच्छेने हजेरी लावतात. बरीच वर्षे कीर्तनकारांची जबाबदारी प्रसिद्ध कीर्तनकार (कै.) ताराबाई देशपांडे यांनी सांभाळली होती. आता हभप श्रेयसबुवा कुलकर्णी यांनी ही बाजू सांभाळली आहे. उत्सव जरी फेब्रुवारीमध्ये होत असला, तरी त्यासाठी वर्षभर विविध प्रकारचे काम करावे लागते. वर्षभर विविध विषय आणि व्याख्यात्यांचा शोध सुरू असतो. पुणेकरांना जसे चांगले वक्ते या उत्सवामुळे ऐकायला मिळतात, तसेच विषयांमध्येही वैविध्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो.

उत्सवाचे वेगळेपण काय आहे?

पूर्वी पोस्टाने वा प्रत्यक्ष भेटून निमंत्रण द्यायचो. आताही प्रत्यक्ष देतोच, पण समाजमाध्यमाचा वापरही करतो. उत्सवातील कार्यक्रमाला अध्यक्ष जसा नसतो, तसेच नारळ, पुष्पगुच्छ न देता, व्याख्याते, कीर्तनकार यांना पुस्तक भेट देतो. कीर्तन रोज संध्याकाळी चार वाजता, तर व्याख्यानाची वेळ संध्याकाळी सहाची असते. रामदास स्वामींचा निसर्गाचा अभ्यास होता, त्यामुळे व्याख्यानाच्या आधी रोज एका देशी वनस्पतीची माहिती दिली जाते. या शिरस्त्याबरोबरच वेळेचे पक्के असणाऱ्या पुणेकरांसाठी कार्यक्रम आवर्जून वेळेत सुरू करतो. तसेच, उत्सव असूनही महाप्रसाद नसतो. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असून ते वाया जाऊ नये, तसेच केवळ महाप्रसाद म्हणजे उत्सव हे स्वरूप नसावे याकडे आम्ही आवर्जून लक्ष दिले आहे. व्याख्याते आणि कीर्तनकार ज्ञानी असल्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी, उत्सवाच्या अनुभूतीसाठी श्रोतेमंडळी आवर्जून येतात. आता तरुण पिढीही या उत्सवाकडे वळताना दिसते आहे.

shriram.oak@expressindia.com