पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा चौथा टप्पा २३ तारखेला होणार आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी व खासगी शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर दुपारी १२ नंतर शाळा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत. पुणे जिल्ह्यात ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा आयोजित केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे.

स्पर्धेचा चौथा टप्पा

स्पर्धेचा चौथा टप्पा हा बालेवाडी ते बालगंधर्व रंगमंदिर या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. या मार्गाचे एकूण अंतर ५८ कि.मी अंतर आहे. त्यामुळे पुणे शहरातील होणारी वाहतूक कोंडी तसेच बहुतेक शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने आदेश जारी करण्यात आल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असा असेल स्पर्धेचा टप्पा – ४

पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा टप्पा क्रमांक चार अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम, बालेवाडी येथून स्पर्धेला सुरुवात होणार असून ती पुणे शहरहद्दीत जावून परत राजीव गांधी ब्रिजमार्गे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करणार करुन ती सांगवी, वाकड, निगडी, त्रिवणीनगर, भोसरी, चिखली, पिंपरी काळेवाडी परिसरातून फिरुन परत राजीव गांधी ब्रिज मार्गे पुणे शहर हद्दीत प्रवेश करणार आहे. ही स्पर्धा सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्याकरिता तसेच नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून वाहतूक पर्यायी मार्गान वळविण्यात आलेली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ भागातील शाळा बंद राहणार

विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्याकरीता स्पर्धा मार्गावरील सांगवी, वाकड, रावेत, ताथवडे, पुनावळे, निगडी प्राधिकरण, इंद्रायणीनगर, चिंचवड एम.आय.डी.सी, चिखली, काळेवाडी, भोसरी एम.आय.डी.सी., यशवंतनगर पिपरी, त्रिवेणीनगर या परिसरातील सर्व शासकीय व खासगी शाळा दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तिसरा टप्पा सासवड आणि बारामती तालुक्यात

गुरुवारी, (२२ जानेवारी २०२६) रोजी टप्पा क्रमांक तीनचे सासवड ते बारामती दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची सुरुवात दुपारी १२ वाजून ३० वाजता सासवड येथील नगरपरिषद, चंदन टेकडी येथून होणार असून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे शेवट होणार आहे. या टप्प्यात सासवड व बारामती तालुक्यातून रेस जाणार आहे. या स्पर्धेची एकूण १३७.७ किलोमीटर आहे.

असा असेल स्पर्धेचा टप्पा ३

येथून स्पर्धेचा प्रारंभ होऊन सासवड, सुपे, पानवडी घाट, काळदरी (बोरी फाटा), मांढर, माहूर, परींचे, हरणी, वाल्हे, पिसुर्टी, नीरा, ब्राह्मणधरा, मुर्टी, मोरगाव, तरडोली, जळगाव क.प., कऱ्हावागज, खंडोबानगर, पिंपळी, लिमटेक, कन्हेरी, रुई रोड सावळ, वंजारवाडी आणि विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.