पुणे : ‘सातवीत असताना लग्न झाल्याने शिक्षण सुटले. यावर्षी पुन्हा सुरू केले. ‘आजी तू परीक्षा देणार?’ असे नातवंडांनी विचारले. वयाच्या साठीत परीक्षेला बसले. पण, परीक्षेच्या आदल्या दिवशी पतीचे निधन झाले. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी परीक्षा दिली. आतापर्यंत सहा वेळा परीक्षेला बसले यश आले नव्हते. यंदा त्याला गाठलेच,’ असा प्रेरणादायी अनुभव दहावी आणि पुढील शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या वाटेवरील हिकरणीने सांगितला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला.
अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा जोतिराव फुले यांची द्विजन्मशताब्दी आणि संघटनेच्या दिवंगत अध्यक्ष, मृणाल गोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अत्यंत विपरीत परिस्थितीत, ज्यांनी मोठ्या खंडानंतर पुन्हा शिक्षण सुरू केले. आणि इयत्ता दहावी आणि पुढील शैक्षणिक यश मिळवले त्या अंगणवाडी मदतनीस महिलांचा पुस्तक, गौरवपत्र व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या-लेखिका तमन्ना इनामदार, सभेचे अध्यक्ष नितीन पवार, संरक्षण कामगार संघटना राष्ट्रीय फेडरेशनचे खजिनदार मोहन होळ, महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे खजिनदार महेश बनकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अंगणवाडी ताईंनी व्यक्त केलेल्या मनोगतातून आजही स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी, ज्या विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागते, निम्न सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत जगताना त्यात कसे अडथळे येतात, त्याचे चित्र उभे राहिले. यातील बहुतांश अंगणवाडी मदतनीस यांनी वयाची पन्नाशी पार केली होती. पण, त्यांनी हिरकणी सारखी जिद्द सोडली नाही. एका ताईंचे शिक्षण बारावीनंतर घरातून थांबवले गेले. आई-वडिलांशी दोन वर्षे अबोला तिने धरला.
मनाविरुद्ध लग्न केले गेले. पण, छोटी-मोठी कामे करीत पुन्हा शिक्षण घेतले. त्याचा खर्च स्वतःच्या कमाईतून केला. निगडी परिसरातील अंगणवाडी मदतनिसांचा पाच जणींचा गट आहे. त्यांनी ठरवलं, सगळेजण शिकून आपल्या पुढे जात आहेत. आपण का मागे राहायचं? जिद्दीने त्यांनी अभ्यास सुरू केला आणि पाचही जणी यावर्षी दहावी झाल्या. आपल्या प्रयत्नांची दखल संघटनेने घेतल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षणाच्या वाटेवरील गौरवविण्यात आलेल्या या हिरकणींमध्ये शालन थोरात, लीला बनसोडे, मिलन भालेराव, रुक्मिणी माने, चंदा ओव्हाळ, अरुणा कांबळे, प्राजक्ता बनसोडे, मालती साबळे, अलका कोकाटे, शैला पवार, संगीता काकडे, अरुणा चव्हाण यांचा समावेश होता. प्रियांका हुले यांनी स्वागत केले. शैलजा चौधरी यांनी प्रास्ताविक केले. शकुंतला घोरपडे यांनी आभार मानले.
