पुणे : पुणे शहरातील वाघोली पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे हवालदार परमेश्वर माणिक पाखरे यांनी मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. एका महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून तक्रारदार महिला पतीपासून विभक्त झाली आहे. तक्रारदार महिला मूळची सांगली जिल्ह्यातील असून तिचा पती वाघोली भागात राहायला आहे. तिने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तो मान्य करून न्यायालयाने तिला दरमहा पाच हजार रुपये पोटगी मंजूर केली होती.

मात्र पतीने पोटगीची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्या महिलेने ६ लाख ६५ हजारांची थकीत पोटगी मिळण्यासाठी विटा न्यायालयात मालमत्ता जप्तीचे वॉरंट बजावण्यासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालायने मंजूर देखील केला होता. वॉरंट बजावण्यासाठी वाघोली पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आणि या कामाची जबाबदारी पोलीस हवालदार परमेश्वर पाखरे याच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र परमेश्वर पाखरे हे वॉरंट बजावत नव्हते. त्यानंतर महिलेने वाघोली पोलीस स्टेशन गाठत परमेश्वर पाखरे यांची भेट घेतली आणि त्या वेळी हवालदार परमेश्वर पाखरे यांनी वॉरंट बजावण्यासाठी त्या महिलेकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत महिलेने आमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानंतर तक्रारदार महिलेने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास वाघोली पोलीस स्टेशनसमोरील चहाच्या टपरीवर बोलवले आणि आम्ही त्या ठिकाणी सापळा लावून परमेश्वर पाखरे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले असून अधिक तपास सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.