पुणे : गुढीपाडव्याच्या मुहर्तांवर बाजारात कोकणातून हापूसची आवक वाढते, तसेच खरेदीही मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, यंदा गुढीपाडव्याला बाजारात हापूसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. तापमानातील चढ-उतार, दमट वातावरण, थ्रिप्स, तुडतुड्या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने हंगामाच्या पहिल्या टप्यामध्ये बागांमध्ये मोहोर टिकला नाही. यंदा मोठ्या प्रमाणावर मोहोर येऊनही प्रत्यक्षात फळधारणा कमी झाल्याने उत्पादनात घट झाली.

अक्षय तृतीयेला पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. त्यानंतर आंबा खाल्ला जातो. मात्र, गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते, तसेच कोकणातून आंब्याची आवकही वाढते. गुढीपाडवा गुरुवारी (१९ मार्च) आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात हापूसची आवक अतिशय तुरळक प्रमाणावर होत असून, बाजारात मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदीचा मुहूर्त यंदा हुकणार आहे. बाजारात सध्या केरळ, कर्नाटक, तसेच बाणकोट परिसरातील आंब्याची आवक होत आहे. मात्र, केरळ, कर्नाटकातील आंब्याला फारशी मागणी नसल्याचे सांगण्यात आले.

‘बदलत्या हवामानाचा यंदा आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवातीला चांगला मोहोर आला होता. तापमानातील चढ-उतार, दमट वातावरण, थ्रिप्स, तसेच तुडतुड्या किडीच्या प्रादुर्भावामुळे यंदा मोहोर टिकला नाही’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आंबा व्यापारी करण जाधव यांनी दिली.

उत्पादनात घट झाल्याने आंबा बागायतदारांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. बागांची देखभाल, ओैषध फवारणी, मजुरीचा खर्च वाढल्याने आंबा बागायतदार अडचणीत सापडले आहेत. बागांची देखभाल करण्यासाठी नेपाळहून मजूर येतात. त्यांचा खर्च करावा लागत आहेत.

एक डझन तीन ते पाच हजार रुपये

उत्पादन घटल्याने आंब्याचे दर तेजीत आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोकणातून दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. यंदा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केवळ १५० ते २०० पेट्यांची आवक होत आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची खरेदी केली जाते. यंदा बाजारात आंब्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात एक डझन आंब्याचे दर तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत आहेत. आवक वाढेपर्यंत आंब्याचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती आंबा व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

हंगामच्या पहिल्या टप्यात हापूसची आवक कमी प्रमाणावर होत आहे.. हंगामाच्या दुसऱ्या टप्यात आंब्याची आवक वाढून दर आटोक्यात येतील. साधारणपणे २६ मार्चनंतर हापूसची आवक वाढेल.

-करण जाधव, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड