काशीनाथ देवधर
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटीश तज्ज्ञ अधिकारी वेगवेगळ्या दारुगोळा कारखान्यांमध्ये उत्पादन करून घेत असत. त्यांच्या हाताखाली काम करणारा कामगार वर्ग फक्त भारतीय होता. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर १९३५ ते १९४३ या काळात दारुगोळा व शस्त्रास्त्रांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असे. त्या वेळी ईशापूर, काशीपूर, जबलपूर व खडकी येथील कारखान्यांमध्ये शस्त्रास्त्र निरीक्षणालय (आर्मामेंट इंस्पेक्टरेट) होते. गुणवत्तापूर्ण उत्पादन होते, की नाही हे निरीक्षणालय पाहत असे. तसेच, काही त्रुटी असतील, तर त्यावर उपाययोजना करणे, आवश्यक्तेनुसार थोडे बदल करून पुढे चालू ठेवणे इतपतच त्याचे काम होते. या काळात कारखान्यातील उत्पादनात खूपच वाढ झाली.
पुढे १९४३-१९४६ या काळात मुख्य निरीक्षणालये (चीफ इंस्पेक्टरेट्स) स्थापन केली गेली. त्यात लघुशस्त्रांसाठी ईशापूर, तोफांसाठी जबलपूर व दारुगोळ्यासाठी खडकी, पुणे ही मुख्य निरीक्षणालये कार्यरत होती. १९४६ ते १९५८ या कालावधीत तंत्र विकास संस्था (टेक्निकल डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट – टीडीई) निर्माण करून त्याअंतर्गत, ‘टीडीई’ (शस्त्रास्त्रे) जबलपूर येथे व ‘टीडीई’ (दारुगोळा) खडकी पुणे येथे काम सुरू झाले. १९४७ नंतर सर्व ब्रिटीश अधिकारी व कर्मचारी भारत सोडून गेले. हा काळ परीक्षा घेणारा होता. सर्व जबाबदारी भारतीयांवर येऊन पडली होती. त्यामुळे खूप प्रयोग व कष्ट करून, जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते आत्मसात करून, त्यातील उणिवा दूर करून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी ‘टीडीई’ला सांभाळावी लागली.
दरम्यानच्या काळात तंत्रज्ञान विकास व उत्पादन संचालनालय आणि संरक्षण विज्ञान संस्था कार्यरत होत्या. उत्पादनाकडे लक्ष देणारे संशोधन व त्यानुसार नवनिर्मिती अवघड वाटू लागल्याने १ जानेवारी १९५८ रोजी या संस्था एकत्र करून संरक्षण संशोधन व विकास संस्थेची (डीआरडीओ) स्थापना करण्यात आली. त्यानंतर १ सप्टेंबर १९५८ रोजी शस्त्रास्त्रे संशोधन विकास संस्थेची (एआरडीई) स्थापना करण्यात आली. केवळ शस्त्रास्त्रांचे संशोधन व विकास यासाठी ‘डीआरडीओ’अंतर्गत ही संस्था स्थापन केली गेली. पहिले संचालक ब्रिगेडियर प्रीतमपाल सिंग यांच्या नेतृत्वात ‘एआरडीई’च्या कामास सुरुवात झाली.
सुरुवातीला खडकीच्या दारुगोळा कारखान्याच्या आवारात ‘एआरडीई’चे कामकाज चाले. केवळ १२ अधिकारी, ३३ अराजपत्रित अधिकारी व १९० कर्मचारी अशा एकूण सव्वादोनशे जणांनी कामाला सुरुवात केली. टीडीई (शस्त्रास्त्रे) आणि टीडीई (दारुगोळा) यांच्याकडून ७८ प्रकल्प (संशोधन व विकास) घेतले गेले व त्यात काम सुरू झाले. उदा. बॅलेस्टिक, लघुशस्त्र, तोफ अभिकल्पन, रॉकेट, दारूगाळा, नौदलाची शस्त्रास्त्रे, हवाई दलाची शस्त्रास्त्रे, प्रशासकीय, सुरक्षेसाठी सेवा, प्रारूप एकक उत्पादन, भंडार आदी विभागांमध्ये काम चालू झाले. पहिली १२ वर्षे प्रामुख्याने सेवेत असलेली शस्त्रास्त्रे व दारूगोळा यामागील विज्ञान व तंत्रज्ञान समजून घेण्यात गेले. नंतरचे दशक हे असलेल्या शस्त्रास्त्रांची वयोमर्यादा वाढविणे, त्यात सुधारणा करणे व भरपूर प्रमाणात प्रयोग करून अनुभवविश्व वाढविण्यामध्ये गेले.
या काळात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नंतरचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून ‘एआरडीई’च्या जागेचा प्रश्न सुटला व पाषाण येथील विस्तीर्ण परिसरात आवश्यक ती प्रयोगशाळा, कार्यशाळा, चाचण्यांसाठी लागणारी फायरिंग रेंज (फायरिंग रेंज) अशा विविध सुविधांसह सुसज्ज मुख्य इमारत तयार झाली. १६ मे १९७० या दिवशी तत्कालीन संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांचे हस्ते उदघाटन झाले. ‘एआरडीई’चे कार्य अधिक जोमाने पाषाण येथे सुरू झाले.
आपल्याकडे सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा शस्त्रास्त्रे विकसित करण्याचा अनुभव नव्हता. तशा प्रकारचे संशोधन करण्याचा दृष्टिकोनही नव्हता. मात्र, जसजशी गरज भासत गेली, तसे त्यात परिश्रमपूर्वक अभ्यास करून स्वदेशी तंत्रज्ञान वापरून शस्त्रास्त्रेनिर्मिती केली गेली. अतिशय क्लिष्ट अशा विविध शस्त्रास्त्र प्रणालींबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधन करून मोठे कार्यक्रम हाती घेण्यात आले व ते यशस्वी केले.
आत्तापर्यंत ‘इन्सास’च्या रायफल अॅम्युनिशन, ‘पिनाक’चे लाँचर व अग्निबाण तसेच अर्जुन रणगाड्याच्या तोफा व तोफगोळे उत्पादित केले गेले आहेत. ‘इन्सास’ शस्त्रप्रणाली १९९९ च्या कारगिल युद्धात वापरण्यात आली. गेल्या वर्षअखेरीस, २०२५च्या अखेरीस, १२० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाऱ्या ‘पिनाक’च्या सुधारित आवृत्तीची ‘लाँग रेंज गाइडेड रॉकेट’ची (एलआरजीआर-१२०) यशस्वी चाचणी करण्यात आली. ‘पिनाक’ प्रणालीमध्ये माझेही छोटेसे योगदान आहे.
जसा आपला देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला; तसाच शस्त्रास्त्र व दारुगोळा क्षेत्रातही स्वयंपूर्ण व्हावा, केवळ उत्पादनच नव्हे तर स्वदेशी तंत्रज्ञानही असायला हवे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून तिसऱ्या दशकाअखेरीस केवळ प्रकल्प न घेता मोठे कार्यक्रम घेऊन संशोधन सुरू झाले. तिसऱ्या दशकात (१९८०-९०) आपण प्रामुख्याने उलट अभियांत्रिकीचा (रिव्हर्स इंजिनीअरिंग) उपयोग करून सेवेत असलेल्या शस्त्रास्त्र प्रणाली स्वत: तयार करण्याकडे जास्त भर देत असू. परंतु, त्याच काळात नव-नवीन प्रकल्प घेण्यात आले. ज्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करून सशस्त्र दलांना आवश्यक ती शस्त्रास्त्रे व दारूगोळा स्वदेशी तंत्रज्ञानासह देण्यासाठी काम सुरू केले गेले.
‘इन्सास’ या लघुशस्त्र प्रणालीचा विकास, ‘पिनाक’ या बहुनलिका रॉकेट प्रक्षेपण प्रणालीचे संशोधन करून विकसित करण्याचा कार्यक्रम नंतर हाती घेतला. त्याचबरोबर ‘अर्जुन’ रणगाड्याची याची तोफ व दारूगोळा, रणगाडाविरोधी तोफगोळे असे विविध प्रकल्प हाती घेऊन संशोधन सुरू करण्यात आले. हे कार्यक्रम सुरू असताना आधीची कामेही चालूच होती. उदा. विविध तोफगोळ्यांचा विकास – यामध्ये मोर्टर बॉम्बचे सर्व प्रकार, विविध तोफांचे अनेक प्रकारचे तोफगोळे, अतिविस्फोटक (High Explosive), तिमिरनाशक (Illuminating), धूम्रपटल (Smoke), इन्फ्रारेड तरंगरोधी धूम्रपटल आदी प्रकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर नौदलाची शस्त्रास्त्रे व हवाई दलाची शस्त्रास्त्रे यांमध्येही आधुनिक संशोधन, अद्ययावत शस्त्रास्त्रेनिर्मिती करून, सर्व प्रकारच्या चाचण्या घेऊन त्यांची योग्यता, गुणवत्ता सिद्ध करण्यात आली. विकसित केलेले हे स्वदेशी तंत्रज्ञान दारुगोळा कारखान्यांकडे हस्तांतरित (Transfer of Technology) करण्यात आले. अशा तऱ्हेने त्रुटीविरहीत उत्पादन सुरू करून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी ‘एआरडीई’ने पार पाडली.
‘इन्सास रायफल व अॅम्युनिशन’ (१९९५), ‘पिनाक अग्निबाण प्रक्षेपक व रॉकेट’ (२००३), अर्जुन रणगाडयाची तोफ व त्याचे तोफगोळे अशा अनेक गोष्टी १९९० नंतरच्या दोन दशकांत तयार केल्या गेल्या. पहिले काही नमुने करून प्रत्यक्ष चाचण्या घेण्यात आल्या. यांपैकी काही शस्त्रास्त्रे व प्रक्षेपक प्रणाली असलेली वाहने बनवण्यासाठी शस्त्रास्त्रेनिर्मितीबरोबरच सरकारी, खासगी कंपन्यांबरोबरही कामे केली गेली. नंतरची तब्बल दहा वर्षे सैन्यदलांबरोबर सतत संवाद साधून विविध प्रकारच्या सूचनांनुसार रचनेत बदल करून, असंख्य वेळा प्रत्यक्ष युद्ध भूमीवर जाऊन चाचण्या घेतल्या गेल्या. या अतिशय क्लिष्ट प्रणाली अखेर सैन्यदलांच्या सेवेत दाखल झाल्या. त्यांचे तंत्रज्ञान हस्तांतरण २०००-२०१० या दरम्यान शस्त्रास्त्रेनिर्मिती कारखान्यांकडे करण्यात आले.
सर्व भारतीय क्षेपणास्त्रांचे वॉरहेड्स, इन्सास लघुशस्त्र प्रणाली, १५५ मिमी ५२ कॅलिबर एटॅग्स (ATAGS : भारतीय मुलुखमैदान तोफ तसेच सुरुंग प्रणाली), गाइडेड पिनाक इत्यादी अत्याधुनिक व शत्रूच्या तोडीस तोड अशी भारतीय शस्त्रास्त्रे ‘एआरडीई’ बनवीत आहे.
‘एआरडीई’ने स्थापनेपासून आतापर्यंतच्या दीर्घ काळात विविध विषयांत प्रभुत्व मिळवले. यात, दारुगोळा, सुरुंग, हातबॉम्ब; लघुशस्त्रे व दारुगोळा, रणगाड्याची तोफ व तोफगोळे, उखळी तोफ व तोफगोळे, क्षेपणास्त्रांसाठीचे युद्धशीर्ष (वॉरहेड्स), विमानांतून सोडण्याचे बॉम्ब, मुलुखमैदान तोफ व तोफगोळे, बॉम्ब फ्यूज, शक्ती काडतुसे (विमानांसाठी लागणारी) यांचा समावेश आहे. अशा सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्र प्रणालींसाठी लागणारे शत्रूच्या तोडीसतोड किंबहुना सरस व अत्याधुनिक आणि अद्ययावत तंत्रज्ञानही ‘एआरडीई’ने विकसित केले. त्यामध्ये प्रक्षेपणशास्त्र (Ballistics), वायुगतिकीय शास्त्र (Aerodynamics), संवेदक शास्त्र (Sensors), दूरमापी शास्त्रे (Telemetry), उच्च ऊर्जा पदार्थ विज्ञान (High Energy Materials), अद्ययावत सामग्री विज्ञान (Material Science), सूक्ष्मीकरण शास्त्र (Miniaturization), अद्ययावत उत्पादन शास्त्र (Modern Production Technology) आदींचा समावेश आहे.
‘एआरडीई’ने पुढील ३० वर्षांमध्ये कशा प्रकारची शस्त्रास्त्रे लागतील व त्यासाठी आणखी कोणकोणत्या शास्त्रांमध्ये व तंत्रज्ञानामध्ये पारंगत होण्याची गरज आहे, याचा एक आराखडा विकसित केला असून, त्यानुसार मार्गक्रमण सुरू आहे. भविष्यकालीन युद्धांसाठीच्या सशस्त्र सेनादलांच्या गरजा लक्षात घेऊन शस्त्रास्त्रे विकास कार्यक्रम घेण्याचे योजिले आहे. यामध्ये शस्त्रास्त्रांबरोबरच आर्मामेंट इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, संगणकीय शास्त्र, संवेदक, कृत्रिम बुद्धिमत्ता, नियंत्रण अभियांत्रिकी (Control Engineering ), निर्देशन व उपकरण अभियांत्रिकी (Guidance and Instrumentation Engg.), ऑटोमेशन या तंत्रज्ञानांची जोड देऊन प्रणाली विकसित करण्याला प्राधान्य देण्यात येईल.
पिनाक अग्निबाण प्रणाली, ॲटॅग्ज मुलुख मैदानी तथा डोंगरी मिश्र तोफ (हॉवित्झर), अर्जुन रणगाडा प्रणाली, इन्सास लघुशस्र प्रणाली अशी विविध शस्त्रास्त्रे आता आपण केवळ आपल्याचसाठी बनवून आत्मनिर्भर झालो आहोत, असे नव्हे, तर आपण निर्यातसुद्धा करीत आहोत.
‘एआरडीई’ने Service to the Services हे ब्रीदवाक्य प्रमाण मानूनच गेल्या ६८ वर्षांत प्रचंड काम करून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले. अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे प्रणाली विकसित करून भारतीय सैन्यदलांच्या भविष्यकालीन युद्धांसाठीच्या शस्त्रास्त्रांच्या गरजा ‘एआरडीई’ निश्चितच पूर्ण करील व देश या क्षेत्रात बलशाली स्वयंपूर्ण होईलच, या शंका नाही.
(लेखक संरक्षण, संशोधन व विकास संस्थेमधील (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिक आहेत आणि ‘एआरडीई’मधून समूह संचालक (ग्रुप डायरेक्टर) पदावरून निवृत्त झाले आहेत.)
