पुणे : लष्करी अधिकारी आणि जवानांना आता उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये (एआयटी) यंदापासून एम.टेक आणि पीएच.डी. अभ्यासक्रमही सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे महाविद्यालयात बीटेक अभ्यासक्रमाच्या पाच शाखांच्या क्षमतेमध्ये वाढ होऊन ती वार्षिक ४८० विद्यार्थ्यांवर पोहोचली आहे.
लष्करी अधिकारी आणि जवानांच्या पाल्यांसाठी १९९४मध्ये ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ची पुण्यात स्थापना करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एआयटीला नुकताच स्वायत्त दर्जा मिळाला आहे. ‘आर्मी वेलफेअर एज्युकेशन सोसायटी’अंतर्गत (एडब्ल्यूईएस) देशभरातील १२ महाविद्यालयांमध्ये स्वायत्त दर्जा मिळवणारे एआयटी पहिलेच महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्त दर्जामुळे एआयटीला आता अभ्यासक्रम, परीक्षा पद्धतींमध्ये बदल, नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत एआयटीमध्ये केवळ लष्करातील अधिकारी, जवानांच्या पाल्यांनाच प्रवेश मिळत होता. मात्र, त्याशिवाय गेल्या वर्षापासून भारतीय नौदल आणि वायुदलाच्या जवानांच्या पाल्यांनाही प्रवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या पाल्यांसाठी १० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, एआयटीचे संचालक मेजर जनरल उदय शंकर सेनगुप्ता म्हणाले, ‘स्वायत्तता मिळाल्यामुळे संस्थेला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. संस्थेला स्वतःच्या पातळीवर बदल करण्याची मुभा मिळणार आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने होणारे बदल लक्षात घेऊन, आता उद्योगांच्या गरजेनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग (एमएल) आणि क्वांटम कम्प्युटिंग असे नवे, अद्ययावत अभ्यासक्रम सुरू करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे. परीक्षा पद्धतींमधील बदल, नवनव्या प्रयोगशाळा उभारणे शक्य होणार आहेत. उद्योग क्षेत्र आणि माजी विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानुसार भविष्यातील अभ्यासक्रम विकसित केले जातील. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्यही घेतले जात आहे.
सध्या भारतीय लष्कराचे किंवा ‘आर्मी डिझाईन ब्युरो’चे (एडीबी) बहुतांश तांत्रिक व संशोधन प्रकल्प देशातील ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थांना (आयआयटी) मिळतात. मात्र, लष्कराचे तांत्रिक प्रकल्प ‘एआयटी’ला मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही सेनगुप्ता यांनी सांगितले. एआयटीचे विद्यार्थी गुणवान आहेत, लष्करी वातावरणाशी परिचित असल्याने ते लष्कराला आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि प्रक्रियांमध्ये महत्त्वाचे योगदान देऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

