पुणे : पुणे जिल्ह्यातील ओतूर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशींना राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पकडले. त्यांच्याकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले.ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २९), मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २८, दोघे सध्या रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जिल्हा शारखीरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात बेकायदा वास्तव्य, तसेच परकीय नागरिक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताजमीर आणि मोहम्मद मूळचे बांगलादेशातील असून, ते ओतूर परिसरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एटीएस आणि ओतूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मोबाइल संच, तसेच कालबाह्य झालेले बांगलादेशी पारपत्र आणि व्हिसाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे, हवालदार शरद जाधव, तांदळवाडे आणि पथकाने ही कारवाई केली.

पंधरा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य

आरोपी ताजमीर, मोहम्मद हे ओतूर परिसरात रंगारी म्हणून काम करत होते. गेले पंधरा वर्षे दोघे जण ओतूर परिसरात बेकायदा वास्तव्य करत होते. दोघांनी घुसखोरी कशी केली, या दृष्टीने चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली.