पुणे : दिल्लीतील स्फोट, तसेच फरिदाबाद, जम्मू-काश्मिरमधून मोट्या प्रमाणावर स्फोटके जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील कोंढवा भागातील संशयितांची चौकशी केली.
‘एटीएस’च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील काही संशयितांची चौकशी केली आहे. कोंढव्यातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून मोबाइल संच, इलेक्ट्राॅनिक साधने जप्त करण्यात आली. दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरुन कोंढव्यातून संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नुकतीच अटक केली.
दिल्लीतील स्फोट, तसेच जम्मू काश्मिर, फरीदाबाद परिसरातून मोठ्या प्रमााणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. त्याअनुंषगांना कोंढवा, मुंब्रा भागातील संशयितांची चौकशी सुरू केली आहे, अशी मााहिती ‘एटीएस‘च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर (वय ३२) याला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे रेल्वे स्थानक परिसरातून नुकतीच अटक केली. ‘एटीएस’ने ९ ऑक्टोबर रोजी कोंढवा, वानवडी, खडकी भागात छापे टाकले होते. ‘एटीएस’च्या कारवाईनंतर तो चेन्नईला गेला होता.
चेन्नईहून पुणे रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आला. जुबेर मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला. जुबेर याला न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (१४ नोव्हेंबर ) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
जुबेर वापरत असलेला जुना मोबाइल संच त्याच्या साथीदाराच्या घरातून जप्त करण्यात आला. या मोबाइलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, ओमानमधील पाच जणांचे संपर्क क्रमांक आहेत. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याला अटक झाल्याची माहिती मिळताच साथीदारांनी दहशवादी विचारधारेची प्रसार करणारी पुस्तके, तसेच अन्य कागदपत्रे काळेपडळ येथील एका मदरशाच्या मोकळ्या जागेत जाळल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्याच्या मोबाइल, लॅपटाॅपमधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.
लॅपटाॅपमध्ये काही पीडीएफ फाइल, तसेच समाजमाध्यमातील संवादात काही सांकेतिक शब्दांचा वापर झाल्याची शक्यता आहे. जुबेरच्या एका साथीदाराच्या घरातून दोन लाख ३५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कोणी दिली, तसेच त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता, या दृष्टीने तपास सुरू आहे. जुबेरच्या संपर्कात असलेल्या १८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. काही जणांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा एक साथीदार शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आला आहे.
