पुणे : किरकोळ वादातून तरुणावर कात्रीने वार करण्यात आल्याची घटना गुलटेकडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एकाला अटक केली. गुलटेकडी भागात दोन दिवसांपूर्वी कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडाने एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती.

आतिष सतीश अडागळे (वय २९, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शाकीर मेहबूब शेख (वय ४३, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली. याबाबत अडागळे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अडागळे आणि शेख एकाच भागात राहायला आहेत. आतिष हे गुरुवारी रात्री बहीण संगीता राजू उमाप गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी शेख तेथे आला. ‘तू वस्तीतील मोठा नेता झाला का ?’, अशी विचारणा करून त्याने अडागळेला शिवीगाळ केली. शेखने त्याच्याकडील कात्रीने डोक्यावर वार केले. त्याला मारहाण करून शेख पसार झाला. पोलिसांनी शेखला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक जोग तपास करत आहेत.

हेही वाचा – Ganeshotsav 2024: ढोल-ताशांच्या निनादात गणरायाचे जल्लोषात स्वागत, मानाच्या गणपतींची विधिवत मुहुर्तावर प्रतिष्ठापना

हेही वाचा – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई; कोंढव्यातून ४० लाखांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त

गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात दोन दिवसांपूर्वी वैमनस्यातून कारागृहातून जामीन मिळवून बाहेर आलेला गुंड आणि साथीदारांनी एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. गुलटेकडी भागात खूनाची घटना ताजी असतानाच वादातून तरुणावर कात्रीने वार करुन त्याचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.