पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील आणखी एक नोकरी गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पुण्यातील औंधमधील एका आयटी कंपनीने अचानक कार्यालय बंद केले असून कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचे वेतनही दिले नसल्याचे समोर आले आहे. सध्या आयटी क्षेत्रात सुरू असलेले कर्मचारी कपातीचे वारे आणि त्यात हाती नोकरीही नाही, यामुळे सुमारे दीडशे तरुण आयटी अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, कंपनीच्या फरार झालेल्या अधिकाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
आयटीनगरी अशी ओळख असलेल्या पुण्यात आयटी कंपन्यांत नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. याआधी असे चार ते पाच नोकरी गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. आता औंधमधील ‘क्रिएटिव्ह वेब सोल्यूशन्स’ या कंपनीने तरुण अभियंत्यांची नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या कंपनीच्या विरोधात आतापर्यंत ३६ तरुणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारींच्या आधारे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीत सुमारे १५० कर्मचारी कार्यरत होते. इतरही कर्मचारी आता तक्रारीसाठी पुढे येत असून पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘क्रिएटिव्ह वेब सोल्यूशन्स’ कंपनीने या तरुणांना मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी तरुणांकडून सुरक्षा ठेव, सल्लागार शुल्क, प्रशिक्षण शुल्क या नावाखाली प्रत्येकी १ ते ३ लाख रुपये घेतले. त्यानंतर या तरुणांना प्रशिक्षणाच्या नावाखाली कंपनीत रुजू करून घेण्यात आले. प्रशिक्षण कालावधीत मानधन आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या आयटी कंपनीत नोकरी मिळेल, असे या तरुणांना सांगण्यात आले. कंपनीने चार महिन्यांनंतर या तरुणांना कोणतेही वेतन न देता आणि मोठ्या आयटी कंपनीत नोकरीस न लावता अचानक कार्यालय बंद करून गाशा गुंडाळला. कंपनीकडून १५० पेक्षा जास्त जणांची फसवणूक झाली असून, यामुळे एकूण फसवणुकीचा आकडा १३ ते १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा फसवणूक झालेल्या तरुणांनी केला आहे.
गृह मंत्रालयाकडेही तक्रार
कंपनीकडून फसवणूक झालेल्या तरुणांकडे त्यांनी व्यवस्थापनाला पैसे दिल्याचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. यात बँक व्यवहार आणि देयकाचे तपशील आहेत. हे पुरावे चतु:शृंगी पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीबरोबर जोडण्यात आले आहेत. या प्रकरणी राज्याच्या गृह विभागाबरोबरच केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या तरुणांची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यांनी पैसे गमावले असून, ते आता न्यायासाठी धडपडत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी भूमिका ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ संघटनेने मांडली आहे.
आणखी तक्रारदार पुढे
‘कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी तक्रारदार पुढे येत आहे. त्यांचे जबाब आम्ही नोंदवून घेत आहोत. काही कर्मचाऱ्यांनी भीतीने आधी तक्रार करणे टाळले, असेही कर्मचारी आता तक्रार करीत आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली.
