पुणे : पुणेकरांचा प्रवास आता एक सप्टेंबरपासून महागणार असून, रिक्षा-रुग्णवाहिकांच्या भाडेवाढीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांचा प्रवास महागणार असून, रिक्षा प्रवासाबरोबरच रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

रिक्षाच्या पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच रात्रीच्या प्रवासासाठी पुणे-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत वीस टक्के आणि हद्दिबाहेर चाळीस टक्क्यांपर्यंत अधिकचे भाडे आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच मीटरमध्ये नवीन दर अद्ययावत करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत असून, तोपर्यंत ‘आरटीओ’ने दिलेल्या दरपत्रकानुसार भाडे आकारता येणार आहे.

रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार नवीन दर निश्चित करण्यात आले असून, आता दोन तासांसाठी ७०० रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ‘आरटीए’ने मंजुर लागू केलेल्या नवीद दरापेक्षा अधिक दर आकारणाऱ्या रुग्णवाहिकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून, प्रत्येक फेरीनंतर रुग्णवाहिकेच्या निर्जंतुकीकर बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रुग्णवाहिका तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी चालक-मालकांची आहे.

रिक्षाचे नवीन दर

  • पहिल्या दीड किलोमीटरसाठी : २५ रुपयांवरून ३० रुपये
  • पुढील प्रति किलोमीटर : १७ रुपयांवरून २० रुपये
  • १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

रुग्णवाहिकांचे दर (दोन तासांसाठी)

रुग्णवाहिकेचा प्रकारभाडे (रुपयांमध्ये२५ किलोमीटरपुढे प्रती किलोमीटर दरप्रतिक्षा भाडे
मारुती व्हॅन७००१६१२५
मारुती ईको, टाटा मॅजिकसाठी९००१७१२५
महिंद्रा, बोलेरो, फोर्स क्रुझरसाठी१२००१८१५०
मोठ्या रुग्णवाहिकांसाठी१५००२२१७५
मोठ्या वातुनुकूलित रुग्णवाहिकांसाठी२५००३०२५०

रिक्षांचे थांबेही बदलले

त्रिमूर्ती चौकाजवळील पीआयसी रिक्षातळ, सुर्यमुखी दत्त मंदिर रिक्षा थांबा, एसएनडीटी बस स्टॉप शेजारील कॅनॉल रस्त्यावरील रिक्षा थांब्यांची मान्यता आरटीओकडून रद्द करण्यात आली आहे. तर, विश्रांतवाडी चौकातील विश्रांती रिक्षा थांबा कळसगाव येथे स्थलांतरीत करण्यात आला असून, या थांब्यावर पाच रिक्षा थांबविण्याची परवानगी देण्यात आली आहे. संजीवन हॉस्पिटलसमोरील रिक्षा थांबा हॉस्पीटलच्या भिंतीलगत स्थलांतरीत करण्यात आला असून, तिथे सहा रिक्षा थांबविण्याची परवानगी असेल. पिंपरी चौकातील रातराणी रिक्षा थांबा आता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भिंतीलगत मागील बाजूस स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

शेअर रिक्षांच्या थांब्यांवर दरपत्रक

नव्या दरपत्रकानुसार शहरातील २८ मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांपासून शेअर-ए- रिक्षा योजना राबविण्यात येणार आहे. सर्व शेअर रिक्षा थांब्यावर शेअर-ए-रिक्षांसाठीच्या दराचे फलक लावण्याच्या सुचना मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.