पुणे : रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून, पुणेकरांना पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये मोजावे लागणार आहेत.
एक सप्टेंबरपासून हे दर लागू करण्यात आले असून, त्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) नवीन दरपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात रात्री १२ ते पहाटे पाच या वेळेत २५ टक्के अधिक, तर ग्रामीण भागात रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत ४० टक्के जादा भाडे आकारण्यास ‘आरटीओ’कडून मान्यता देण्यात आली आहे. तसेच रिक्षा चालकांना मीटरमधील बदलांसाठी (रिकॅलिब्रेशन) २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर १ मार्च २०२७ पासून सर्वच रिक्षा चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणेच भाडे आकारावे लागणार असल्याचे ‘आरटीओ’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रिक्षाचे दरपत्रक
अंतर – जुने दर (रुपये) – नवे दर (रुपये)
१.५ किमी – २५ – ३०
२ किमी – ३४ – ४०
३ किमी – ५१- ६०
४ किमी – ६८ – ८०
५ किमी – ८५ – १००
६ किमी – १०२ – १२०
७ किमी – ११९ – १४०
८ किमी – १३६ – १६०
९ किमी – १५३ – १८०
१० किमी – १७० – २००
‘तक्रारीसाठी संपर्क’
‘रिक्षाच्या दरांविषयी तक्रार असल्यास ग्राहकांनी ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ०२०-२६०५८०८० या क्रमांकावर दूरध्वनीद्वारे किंवा rto.12-mh@gov.in ई-मेलवर संपर्क करावा,’ असे आवाहन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
