पुणे : पुणे हे देशातील प्रमुख वाहननिर्मिती केंद्र असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक वाहन निर्मिती कंपन्या पुण्यात आहेत. त्यांना आता सुट्या भागांचा पुरवठा कमी होऊ लागला आहे. या कंपन्यांकडे सर्वसाधारणपणे सुट्या भागांचा आठवडाभराचा साठा असतो. लघुउद्योगांकडून उत्पादन कमी अथवा बंद झाल्यामुळे पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक मोठ्या वाहन निर्मिती कंपन्यांवर उत्पादन कमी करण्याची वेळ आली तर, काही ठिकाणी उत्पादन बंद ठेवावे लागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
वाहननिर्मिती कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणारे हजारो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) पुण्यात आहेत. वाहनांच्या सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योगांपैकी ३० टक्के हे एलपीजीवर अवलंबून आहेत. त्यात प्रामुख्याने प्लेटिंग, कोटिंग आणि फॅब्रिकेशन करणाऱ्या उद्योगांचा समावेश आहे. या उद्योगांमध्ये झोतभट्टीसाठी एलपीजीचा वापर केला जातो.आता दोन आठवड्यांपासून एलपीजी टंचाई असल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.
पुरवठा साखळीतील ५० टक्के उद्योगांकडील एलपीजी साठा संपला असून, उत्पादन कमी करण्यासह बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. एलपीजीऐवजी इलेक्ट्रिक अथवा डिझेल पर्यायाकडे वळणे या उद्योगांसाठी खर्चिक ठरत आहे. भविष्यात एलपीजी पुरवठा सुरळीत झाल्यास त्यांनी यासाठी केलेला खर्च वाया जाणार आहे. याचबरोबर एलपीजीच्या तुलनेत वीज अथवा डिझेलचा वापर केल्यास उत्पादन खर्चात १० टक्के वाढ होते. यामुळे इतर इंधन पर्याय स्वीकारण्याबाबत उद्योगांची द्विधा मानसिकता आहे.
उद्योग विभागाकडून मूल्यमापन सुरू
मोठ्या वाहननिर्मिती कंपन्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या लघुउद्योगांची एक परिसंस्था पुणे परिसरात निर्माण झाली आहे. या उद्योगांची संख्या हजारोंच्या घरात आहे. राज्याच्या उद्योग विभागाने आता एलपीजीवर उत्पादनासाठी अवलंबून असलेल्या उद्योगांची माहिती संकलित करून त्यांच्यावरील परिणामांचे मूल्यमापन करण्याचे पाऊल उचलले आहे. राज्याच्या विकास आयुक्तांनी या आठवड्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन याबाबत आकडेवारी संकलित करण्याचे निर्देश दिले.
कामगारांचे स्थलांतर
वाहन निर्मिती क्षेत्रातील पुरवठा साखळीतील उद्योगांमध्ये लाखो कामगार कार्यरत आहेत. हे कामगार प्रामुख्याने उत्तर भारतातील आहेत. हे कामगार ५ किलोचा एलपीजी सिलिंडर घेऊन त्यावर स्वयंपाक बनवितात. या सिलिंडरचे वितरण बंद झाल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली. यामुळे मोठ्या प्रमाणात कामगार त्यांच्या मूळगावी स्थलांतर करीत आहेत. यातून आगामी काळात कामगारांचा तुटवडा निर्माण होणार आहे.
