पुणे : आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली देहविक्रयाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली. या प्रकरणी चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. महादेवी विकास चौगुले (वय ४२), विकास शंकर चौगुले (वय ५०, रा. सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या बाबत पोलीस हवालदार स्वप्नील सूर्यवंशी यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरातील एका सोसायटीतील सदनिकेत आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची माहिती नऱ्हे पोलिसांना मिळाली. त्यानंतर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी खातरजमा केली. पोलिसांनी सदनिकेत छापा टाकला. या कारवाईत चार तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्या प्रकरणी चौगुले दाम्पत्याला अटक करण्यात आली.
हाॅटेलवर छापा; परराज्यातील दोन तरुणी ताब्यात
एका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रयाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) उघडकीस आणला. या प्रकरणी परराज्यातील दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त केल्याप्रकरणी आसाममधील तीन दलालांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रस्ता परिसरातील एका हाॅटेलमध्ये तरुणींना पैशांचे आमिष दाखवून आणले असून, त्यांना देहविक्रयास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दोन परप्रांतीय तरुणींना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक सोनाली जगदाळे-साठे, पोलीस कर्मचारी ईश्वर आंधळे, बबनराव केदार, अमेय रसाळ, अविनाश कोंडे, किशोर भुजबळ, सुरेखा आंधळे, मनीषा वायसे, फराह पठाण, वैशाली खेडेकर, वैशाली इंगळे यांनी ही कारवाई केली.
