पुणे : ‘सध्याच्या संधीसाधू राजकारणाला तत्त्वज्ञानाचे सोयरसूतक राहिलेले नाही. आवाज दाबला जात असताना गप्प बसून राहिलो, तर सध्या जे घडत आहे ते सदैव सहन करावे लागेल. ही परिस्थिती बदलण्यासाठी सुजाण नागरिकांनी निर्भयपणे बोलावे,’ असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव यांनी शुक्रवारी केले.
डाॅ. आढाव रविवारी (१ जून) वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहेत. हे औचित्य साधून हमाल पंचायत, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि विविध समविचारी संस्थांच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याचा वेध घेणारा ‘सत्यशोधक समाजवादी’ हा माहितीपट दाखविण्यात आला. ‘लोकशाही समाजवादापुढील आव्हाने आणि दिशा’ या विषयावरील परिसंवादाचा समारोप करताना आढाव यांनी संवाद साधला. सुभाष वारे, संजय आवटे, अश्विनी सातव-डोके, डॉ. शमसुद्दीन तांबोळी आणि सुभाष लोमटे यांनी परिसंवादात सहभाग घेतला.
‘एक-एक करून नागरिकांचे सर्व अधिकार काढून घेण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत. आम्ही सांगू ती दिशा असे स्वरूप असलेल्या कालखंडामध्ये सामान्यांचे जगणे मर्यादित झाले आहे’, याकडे लक्ष वेधून आढाव म्हणाले, ‘आजही आपले प्रश्न सुटलेले नाहीत. असे असेल तर लोकशाही कशी टिकणार? तरुणांचा आवाजही दाबला जात आहे. त्यामुळे तरुणांनो फक्त बोलून चालणार नाही, कृती करण्याची गरज आहे.’