पुणे : हसण्याची बाराखडी, ‘ए आय‘ची आभासी न्यारी दुनिया, कथा-कवितांचे रंगीत राज्य आणि विज्ञानाच्या विश्वातील गप्पागप्पा—अशा विविध उपक्रमांनी गेल्या पाच दिवसांत पुण्यातील बाल पुस्तक जत्रा अक्षरशः गजबजून गेली. हजारो चिमुकल्यांनी या जत्रेत केवळ मनोरंजनच नाही, तर विविध विषयांशी हसत-खेळत मैत्री केली. पुस्तकांच्या असंख्य दालनांतून फिरत त्यांनी नव्या कल्पनांचे, विचारांचे विश्व उलगडून पाहिले. या जत्रेचा समारोप काल पारंपरिक लोकवाद्य असणारे संबळ वादन आणि बालगीत रामायणाच्या सुरेल सादरीकरणाने रंगतदार वातावरणात झाला.
समारोपाच्या दिवशी मोहिनी भुसे यांचे संबळ वादन आणि स्वरतरंग संगीत अकादमीच्या वतीने चाळीस मुलांनी बाल गीतरामायण सादर केले. तत्पूर्वी काल सकाळच्या सत्रात डॉक्टर श्रुती पानसे यांनी लहान मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करावा याविषयी मार्गदर्शन केले.
या जत्रेचे यंदाचे दुसरे वर्ष होते. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने या जत्रेचे आयोजन करण्यात आले होते.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ३० एप्रिल ते ४ मे पर्यंत चालणाऱ्या या जत्रेत पुस्तकांच्या प्रदर्शनाबरोबरच विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन आणि लहान मुलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१०० हून अधिक पुस्तक दालनांनी सजलेल्या या जत्रेत मुलांसाठी ज्ञान, करमणूक आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. तसेच या जत्रेत ‘गीतरामायण’, पपेट शो, जादूचे प्रयोग, विविध साहसी आणि ग्रामीण खेळांची ओळख, मुलांचे कविसंमेलन तसेच आवडत्या लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी अशा विविध आकर्षक उपक्रमांची मेजवानी लहानग्यांना मिळाली.
गोंधळ या पारंपारिक लोककलेतील संबंळ हे महत्वाचे वाद्य. या वाद्यवादनात पुरुषांची मक्तेदारी होती. मात्र, नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावातील मोहीनी भुसे हिने संबळ वादन करत सर्वांना मंत्रमुग्घ केले. भारतातील एकमेब संबळ वादक म्हणुन तिची ख्याती आहे.
पाच दिवस चालणा-या .या बाल पुस्तक जत्रेत ४५ हजारहून अधिक मुलांनी भेट दिली तर ९० हजारहुनअधिक पुस्तकांची विक्री झाली. अशी माहीती पुस्तक जत्रेचे संयोजक राजेश पांडे यानी समारोप प्रसंगी दिली. तसेच, या पुस्तक जत्रेत विज्ञानावर आधारित पुस्तकांची सर्वाधिक विक्री झाल्याचेही संयोजकांनी सांगितले.
