Pune Bal Pustak Jatra: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी आणि त्यांना वाचनाच्या अनोख्या विश्वात रमता यावे या हेतूने येत्या गुरुवार (३० एप्रिलपासून) शहरात ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ भरविली जाणार आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ४ मे पर्यंत चालणाऱ्या या जत्रेत पुस्तकांच्या प्रदर्शनाबरोबरच विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मार्गदर्शन आणि लहान मुलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने ही जत्रा भरविली जाणार आहे. यंदा या जत्रेचे दुसरे वर्ष आहे, अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे, पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नगसेवक सुनील पांडे, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वासंती जाधव, सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या जत्रेचे उद्घाटन होणार आहे. या जत्रेत सहभागी होणाऱ्या मुलांना खाऊ तसेच एक पुस्तक भेट म्हणून दिले जाणार आहे.
‘मुलांना वाचणाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा मोबाईल तसेच टीव्ही बघण्याचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने ही पुस्तक जत्रा भरविण्यात आली आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक पुस्तकांची दालने असणार असून लहान मुलांशी संबंधित शक्यतो सर्व पुस्तके तेथे असतील, असा प्रयत्न राहील,’ असे राजेश पांडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘या जत्रेमध्ये सर्वसाधारण एक लाख मुले सहभागी होतील, असा प्रयत्न राहणार असून त्यासाठीचे आवश्यक ते नियोजन पूर्ण केले जाईल, मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल. गीतरामायण, पपेट शो, जादूचे प्रयोग, विविध साहसी खेळ खेळण्याची संधी, ग्रामीण खेळांची ओळख, मुलांचे कविसंमेलन आणि लेखकांना भेटीची संधी, असे उपक्रम यामध्ये राबविले जाणार आहेत.
देशभक्ती आणि सामाजिक जाणीव
भारतीय वायुसेनेच्या कार्याची ओळख करून देणारा ‘सलाम भारतीय वायुसेनेला!’ हा विशेष कार्यक्रम ३ मे रोजी होणार आहे. यामध्ये विमानांची प्रात्यक्षिके आणि एरो मॉडेलिंग सादर केले जाईल. तसेच, मुलांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘स-संविधानाचा!’ हे बालनाट्यही सादर होणार आहे. डिजिटल युगात मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ ही पालकांसाठी मोठी समस्या बनली आहे. यावर उपाय शोधण्यासाठी श्रुती पानसे आणि स्मिता वळसंगकर यांचे विशेष सत्रदेखील जत्रेत आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले
