पुणे : यंदाचे शंभरावे अखिल भारतीय साहीत्य संमेलन पुण्यात होणार असुन याला सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी माहीती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात दिली. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला नवी भरारी मिळावी आणि त्यांना वाचनाच्या रंगीबेरंगी, समृद्ध विश्वाची ओळख व्हावी, या उद्देशाने शहरात आजपासून ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ उत्साहात सुरू झाली आहे. या जत्रेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आमदार हेमंत रासने, मराठी भाषा विभागाचे संचालक श्यामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, संवाद पुणेचे सुनील महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या जत्रेचे यंदाचे दुसरे वर्ष असून पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या वतीने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ४ मे पर्यंत चालणाऱ्या या जत्रेत पुस्तकांच्या प्रदर्शनाबरोबरच विज्ञान गप्पा, कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शन आणि लहान मुलांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठी भाषा संचालनालयाच्या तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
१०० हून अधिक पुस्तक दालनांनी सजलेल्या या जत्रेत मुलांसाठी ज्ञान, करमणूक आणि सर्जनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. चार एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या जत्रेत ‘गीतरामायण’ पपेट शो, जादूचे प्रयोग, विविध साहसी आणि ग्रामीण खेळांची ओळख, मुलांचे कविसंमेलन तसेच आवडत्या लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी अशा विविध आकर्षक उपक्रमांची मेजवानी लहानग्यांना मिळणार आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेत मराठी बालविभाग सुरु करण्यात येणार असल्याचे योगेश सोमण यांनी यावेळी सांगितले.
लंडनमध्ये साकारणार वैश्विक भाषा केंद्र
राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत आभासी पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय आणि वैश्विक भाषा केंद्र येत्या दोन महिन्यात लंडनमध्ये सुरू होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय ७५ मंच तयार करण्यात येणार असून आतापर्यंत ३९ मंच पूर्ण झाले आहे.
आंबेगाव इथे जी शिवसृष्टी साकार झाली आहे ती पाहण्यासाठी लहान मुले येतात. त्यांना अडीचशे रुपये शुल्क आकारत होतो. पण आता लहान मुले आणि महीला यांना ही शिवसृष्टीची सफर मोफत असणार आहे अशीही माहीती चंद्रकात पाटील यांनी यावेळी दिली.
