पुणे : बाणेर-पाषाण भागातील होणारी वाहतूक कोंडी आता लवकरच सुटणार आहे. या भागात असलेल्या लिंक रस्त्यासाठीच्या भूसंपादनाचा तिढा तब्बल १५ वर्षांनंतर सुटला आहे. या रस्त्यासाठी अंतिम निवाडा (अवॉर्ड) जाहीर झाला असून, महापालिका प्रशासनाने या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा रस्त्यासाठी रखडलेले भूसंपादन झाल्याने या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आणि रहिवाश्यांना दिलासा मिळणार आहे.
पुणे महापालिकेने तयार केलेल्या पुणे शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) पाषाण येथील सर्व्हे क्रमांक १३४ ते १३८ व १४० मधून ३६ मीटर रुंद बाणेर पाषाण लिंक हा डीपी रस्ता प्रस्तावित आहे. सर्वसाधारणपणे १.२ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले, तरी काही खासगी जागा मालकांची जागा मिळत नव्हती. महापालिकेच्या पथ विभागाने खासगी जागा मालकांची जागा ताब्यात यावी यासाठी गेल्या १५ वर्षांपासून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले होते. आवश्यक असलेली जागा ताब्यात येत नसल्याने भूसंपादनाच्या अडचणींमुळे या रस्त्याच्या महत्त्वाच्या भागाचे काम थांबले होते.
रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना आणि वाहनचालकांना होत होता. वाहतुकीची कोंडी या भागात होते. तासनतास वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. या रस्त्यांचे रखडलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती.
या प्रकल्पासाठी ही जागा ताब्यात घेणे आवश्यक असल्याने भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून पुणे महापालिकेमार्फत एकूण सुमारे ६८ कोटी रुपयांची भरपाई रक्कम जमा करण्यात आली. आवश्यक त्या कायदेशीर व आर्थिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम निवाडा (अवॉर्ड) घोषित करण्यात आला. त्यानंतर सोमवारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन महापालिकेतर्फे अधिकृत ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या भागातील रखडलेले भूसंपादन होणार असल्याने बाणेर, पाषाण, सुतारवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या रस्त्यामुळे या भागात सतत होणारी वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, भूसंपादन उपायुक्त निखिल मोरे व पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी पाठपुरावा केला. या रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथ विभागातर्फे तातडीने रस्त्याचे उर्वरित काम मार्गी लावले जाईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
