पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात झालेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. ट्रकने पाठीमागून टेम्पोला धडक दिली. त्यानंतर टेम्पो आणि ट्रकने मोटारींना धडक दिली. अपघातात १२ जण जखमी झाले. या प्रकरणी ट्रक आणि टेम्पोचालकासह आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हृदयनाथ मोहन गायकवाड (वय ४७ रा. मेघवाडी पोलीस ठाण्याजवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई), आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय ५० रा. सेक्टर १०, नेरूळ नवी मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्या १२ जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरून पुण्याकडे रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास ट्रक निघाला होता. जांभुळवाडीतील दरीपुलाजवळ लक्ष्मी लाॅजसमोर ट्रकने पाठीमागून टेम्पोला धडक दिली. ट्रक आणि टेम्पोने मार्गिका सोडली. समोरून येणाऱ्या दोन मोटारींना टेम्पो आणि ट्रकने धडक दिली. या अपघातात मोटारीतील प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीतील जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी झालेले गायकवाड आणि वाडकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक, टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघात झाल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.