करोनाच्या पहिल्या लाटेपासून सेवा बंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, बारामती : करोनाच्या पहिल्या लाटेपासून बंद असलेली पुणे-बारामती डेमू रेल्वे मोठय़ा प्रतीक्षेनंतर गुरुवारपासून अंशत: सुरू करण्यात आली. पुणे-दौंड डेमूचा बारामतीपर्यंत विस्तार आणि बारामती-दौंड डेमू पूर्ववत करण्यात आली आहे.

करोनाच्या काळात पुणे-बारामती डेमू सेवा बंद करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पुणे-दौंड डेमी सेवा सुरू करण्यात आली. लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येतो. पुणे-बारामती ही सेवाही सुरू व्हावी, अशी मागणी   होती. खासदार सुप्रीय सुळे यांनीही त्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यानुसार ही सेवा अंशत: सुरू करण्यात आली. बारामती-पुणे दरम्यान दररोज नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. डेमू सेवा बंद असल्याने  नागरिकांची मोठी तारांबळ होत होती. त्यातच एसटीची सेवाही पूर्णपणे सुरू न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागडा पर्याय स्वीकारावा लागत होते. 

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्थानकातून सकाळी ७.०५ वाजता सुटणारे डेमू सकाली ८.५० वाजता दौंड स्थानकात पोहोचेल. तेथून ती सकाळी १०.१५ वाजता बारामतीत दाखल होईल. बारामती येथून दुपारी १.१५ वाजता डेमू सुटेल, ती दुपारी २.४५ वाजता दौंड येते येईल. ही गाडी कटफळ, शिरसाई आणि मळदगाव स्थानकांवर थांबेल.

‘पूर्वीच्या सर्व फेऱ्या पुन्हा सुरू करा’

पुणे-दौंड-बारामती अशा अंशत: फेऱ्या सध्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुणे-बारामती सकाळी एकच गाडी आहे. जाताना केवळ दौंडपर्यंत प्रवास करावा लागतो. बारामतीहून दौंड आणि पुणे अशा फेऱ्या सुरू झाल्यास दोन्ही बाजूने येणे-जाणे सोईचे होईल. त्यामुळे पुणे-बारामती दरम्यान पूर्वीप्रमाणेच सर्व फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या एसटीच्या संपामुळे नागरिकांचे मोठी गैरसोय होत आहे. डेमूच्या सर्व फेऱ्या सुरू करून रेल्वेने ही गैरसोय दूर करावी, अशी मागमी प्रवासी धनंजय जमादार यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune baramati demu railway service started for in passengers after two years zws
First published on: 28-01-2022 at 01:30 IST