पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एका ६५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले आहे. बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी पुणे सातारा महामार्गावर शुक्रवारी रात्री आंदोलन केले. त्यानंतर शनिवारी ग्रामस्थांनी माेर्चा काढून बंद पुकारला. ग्रामस्थांनी ठिय्या आंदालन केले. आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर एका गोठ्यात अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने बालिकेला दगडाने ठेचून मारले. आरोपीने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली पूरल्याचे उघडकीस आल्यानंतर संतप्त पडसाद उमटले. या भागातील नागरिकांनी पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर ग्रामस्थांनी राजगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ’ग्रामस्थांची बाजू ऐकून आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन पोलीस अधीक्षक गिल यांनी दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नसरापूर परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला असून, शनिवारी सकाळी नसरापूर भागताील सर्व व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवले. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. घा घटनेनंतर आमदार शंकर मांडेकर यांनी नसरापूरला भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.
न्यायवैद्यकीय पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आरोपीविरुद्ध खून, बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
