पुणे : बावधन बुद्रुक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत पाच अनधिकृत ‘आरएमसी’ प्रकल्पांचे सुमारे ३५ हजार चौरस फुटांचे बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले. या पाचही प्रकल्पांचा वीजपुरवठा महावितरणकडून कायमस्वरूपी बंद करून घेण्यात आला.
शहरात ‘आरएमसी’ प्रकल्प चालविण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून बावधन बुद्रुक परिसरात काही प्रकल्प बेकायदा पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. याची शहानिशा करण्यात आली. त्यामध्ये तथ्य आढळल्याने महापालिकेच्या बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह विभागाच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली.
या भागातील स्थानिक नागरिकांनी बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात आवाज उठविला होता. या प्रकल्पांमुळे हवेचे प्रदूषण वाढत असून या प्रकल्पांच्या आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. या प्रकल्पांमुळे पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. तसेच वेळोवेळी आंदोलनाचा पवित्रा घेऊन हे प्रकल्प बंद करावेत अशी मागणी ही केली होती.
या सर्व प्रकाराची दखल घेत आणि नागरिकांचा वाढत असलेला विरोध लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने ही कारवाई केली आहे. या कारवाईसाठी नऊ जेसीबी, दोन गॅस कटर, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे ६० जवान, १५ पोलीस कर्मचारी, पाच अतिक्रमण निरीक्षक आणि ४० बिगारी सेवकांची यंत्रणा तैनात करण्यात आली होती.
शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सुहास जाधव, यांच्या मागदर्शनाखाली अधीक्षक अभियंता प्रवीण शेंडे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विकास विभागाचे उपअभियंता भास्कर हांडे आणि शाखा अभियंता अजय फाले यांनी कारवाईचे नियोजन केले.
आरएमसी प्रकल्प म्हणजे काय ?
आरएमसी प्रकल्पात प्रामुख्याने काँक्रीट तयार करणारे बॅचिंग प्लांट, सिमेंटचे सायलो, वाळू-खडीचा साठा, मिक्सर ट्रक आणि काँक्रीट वाहतुकीची व्यवस्था असते. इमारती, पूल, रस्ते यासह मेट्रो आणि इतर मोठे प्रकल्पांचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेले काँक्रीट पुरवण्यासाठी हे प्रकल्प उभारले जातात.
बांधकामाच्या ठिकाणी काँक्रीट तयार करण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे. काँक्रीटची गुणवत्ता आणि मिश्रणाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. मोठ्या बांधकाम प्रकल्पांना सातत्याने काँक्रीट उपलब्ध करून देणे. यासाठी हे प्रकल्प असतात. मात्र, आरएमसी प्रकल्पांचा प्रश्न केवळ बांधकामापुरता मर्यादित नाही. प्रकल्प निवासी भागाजवळ असल्यास सिमेंट व खडीची धूळ, ट्रकची वाहतूक, आवाज, रस्त्यांवरील चिखल आणि वायुप्रदूषण याबाबतच्या तक्रारी या प्रकल्पामुळे वाढतात. गर्दीच्या ठिकाणी आणि ज्या भागात रहिवाशी झोन आहे, अशा ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्यास परवानगी दिली जात नाही. प्रदूषण नियंत्रण महामंडळाची ना हरकत प्रमाणपत्र देखील हे प्रकल्प उभारताना आवश्यक असते.
