scorecardresearch

पुणे : कर्करोगाच्या वेदनांवर मात करत महिलांचे ढोल-ताशा वादन

आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप आणि ढोल ताशा महासंघातर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

पुणे : कर्करोगाच्या वेदनांवर मात करत महिलांचे ढोल-ताशा वादन

कर्करोग या आजाराच्या वेदनांपेक्षा अनेकदा कर्करोग या नावानेच रुग्ण हातपाय गाळतात. मात्र, स्तनांच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ढोल ताशा वादन करत कर्करोगाच्या वेदनांशी झगडणाऱ्या इतर रुग्णांना एक प्रकारे दिलासाच दिला. आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप आणि ढोल ताशा महासंघातर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी स्तनांच्या कर्करुग्णांचे ढोल ताशा वादन ऐकले, तसेच त्या रुग्णांचे अनुभवही ऐकले. या कार्यक्रमासाठी ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर आणि ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.

नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत –

डॉ. शेखर कुलकर्णी म्हणाले, “वय वर्षे ४० ते ७० मधील महिलांना शस्त्रक्रियेनंतर ढोलताशा वादनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल दिसुन आला आहे. हाताच्या वेदना कमी होणे, ताजेतवाने वाटणे, रक्तदाब नियंत्रणात येणे, कोणतेही काम करण्यास उत्साह वाटणे, नैराश्यातून बाहेर पडण्यास मदत असे अनेक सकारात्मक बदल या महिलांमध्ये दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांचे वादन पाहण्यासोबतच अनुभव ऐकणेही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”, असेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

ढोल-ताशा वादनाने हा त्रास कमी होत असल्याचे दिसून आले –

पराग ठाकूर म्हणाले, “स्तनांच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मात्र, ढोल-ताशा वादनाने हा त्रास कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर डॉ. शेखर कुलकर्णी यांनी अशा महिलांना महासंघाने प्रशिक्षण द्यावे, अशी विनंती केली. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक हनुमान मंडळ आणि मंडळाचे कार्याध्यक्ष ओंकार कलडोणकर यांनी त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी पूर्ण केली.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune beating the pain of cancer women play drums and tasha pune print news msr

ताज्या बातम्या