पुणे: डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पूलाच्या कामासाठी उद्या मध्यरात्रीपासून ( ९ जून) ५ सप्टेंबरपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, नदी पात्रातील रस्ता मात्र वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला असून, डेक्कन जिमखाना स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल मुठा नदीवरील भिडे पुलाच्या वरच्या बाजूला बांधण्यात येत आहे. या पादचारी पूलामुळे नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता परिसरातील नागरिकांना, तसेच विद्यार्थ्यांसाठी ये-जा करणे सोपे होणार आहे. सध्या पुलाचे काम सुरु असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने हा पूल बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती महामेट्रोकडून निवेदनाद्वारे देण्यात आली.
दरम्यान, वनाझ ते रामवाडी या मार्गीकेतील छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांना शहराच्या मध्यवर्ती पेठांशी जोडण्याकरिता पादचारी पूल बांधण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणारा पादचारी पूल आता नागरिकांसाठी खुला झाला आहे.
बाबा भिडे पूलाचा इतिहास
बळवंत नारायण भिडे उर्फ बाबा भिडे यांच्या नावावरून डेक्कन जिमखाना आणि मध्यवर्ती पेठेला जोडणाऱ्या पूलाला बाबा भिडे पूल असे नाव देण्यात आले. बाबा भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी हवेली तालुका संघचालक म्हणून इ.स. १९३८ ते १९४२ काम पाहिले. तेव्हापासून अखेरच्या श्वासापर्यंत भिडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम केले. इ.स. १९६७ साली त्यांची महाराष्ट्र प्रांताचे संघचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बाबा भिडे पुण्याच्या सार्वजनिक वर्तुळात सक्रिय होते. त्यांनी अनेक संस्था, संघटनांची अध्यक्षपदे भूषविली.
लोकमान्य टिळकांना हे बाबा भिडेंचे आदर्श. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगलेला होता. वयाच्या ७९ व्या वर्षी भिडे यांनी नाशिकमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्याची दखल म्हणून पुणे महापालिकेने डेक्कन जिमखाना ते केळकर रस्ता परिसराला जोडणाऱ्या मुठा नदीवरील पुलाला बाबा भिडे पूल असे नाव दिले. नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ जून २००० रोजी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलाची लांबी ८८ मीटर आहे. तसेच बाबा भिडे पूल बांधण्यासाठी सुमारे ८१ लाख रुपये खर्च आला आहे.
