पुणे : ‘महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल,’ अशी माहिती राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी बुधवारी दिली.

अतुल सावे यांनी बुधवारी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, अधीक्षक अभियंता बिपिन शिंदे, महात्मा फुले स्मारक रहिवासी कृती समितीचे अध्यक्ष नीलेश गिरमे, पीएमपीएमएल संचालक, नगरसेवक अजय खेडेकर या वेळी उपस्थित होते.

सावे म्हणाले, ‘क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत चर्चा करून भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले आणि कामाची सुरुवात करण्यात आली. सद्य:स्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मारकाचे काम वेगाने सुरू असून सध्याची ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विकासकामे गतीने पूर्ण करण्यात येतील.’

प्रजीत नायर म्हणाले, ‘स्मारकामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित विविध आधुनिक सुविधा असणार असून, यामध्ये ऑडिओ-व्हिडिओ शो, दोन्ही महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘थीम बेस्ड’ ऑडिओ-व्हिडिओ शो आणि होलोग्राफीचे काम करण्यात येणार आहे. या दोन्ही महापुरुषांचे अर्धपुतळे आणि त्यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित केली जाणार आहे. मुली आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र, मार्गदर्शन केंद्र आणि संगणक केंद्र उभारले जाणार आहे. स्मारकात एक ॲम्फीथिएटरदेखील असणार आहे.’