पुणे : आयुष्यातील काही चुकांमुळे ऐन उमेदीच्या काळात त्यांच्यावर कारागृहात जाण्याची वेळ आली. शिक्षा भोगत असताना त्यांच्यातील कलाकाराने आपल्या भावनांना कविता आणि चित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. शिक्षा संपवून बाहेर आल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा नवसर्जनाने श्रीगणेशा होत आहे. ‘झाले मोकळे आकाश…’ हे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन शनिवारपासून पाहण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे.

हा योग जुळवून आणला आहे पुण्यातील भोई प्रतिष्ठान आणि धनकवडी येथील आदर्श मंडळ यांनी. त्यांच्या संयुक्त मोहिमेतून राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणापथ’ प्रकल्पांतर्गत शिक्षा पूर्ण करून नवजीवनाची वाटचाल सुरू करणाऱ्या  मुक्त बांधवांच्या पुनर्वसनासाठी ‘झाले मोकळे आकाश…’ या अनोख्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कारागृहात असताना चित्रकलेची साधना केलेल्या दोन मुक्त बांधवांच्या कलाकृतींचे हे विशेष प्रदर्शन व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे शनिवारपासून (२९ नोव्हेंबर) भरविण्यात येत आहे. सातारा आणि अलिबाग येथील हे बांधव जन्मठेपेची शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडले आहेत. त्यापैकी एक चित्रकार असून दुसरा त्या चित्रासंदर्भातील मुक्त चिंतनात्मक लेखन करणार आहे.  त्यांच्या सर्जनात्मक आविष्कारातून साकारलेली ३५ चित्रे या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर पोलीस महासंचालक सुहास वारके, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार श्रीकांत भारतीय, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विशोष पोलीस महासंचालक सुधीर हिरेमठ, धर्मादाय आयुक्त राजेश परदेशी, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रवीण पाटील, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई आणि चंद्रशेखर दैठणकर यांच्या उपस्थितीत रविवारी (३० नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. १ डिसेंबरपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, अशी माहिती डाॅ. मिलिंद भोई आणि उदय जगताप यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडलेल्या आतापर्यंत ३३ बांधवांना ‘प्रेरणापथ’ प्रकल्पांतर्गत आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी मदत करण्यात आली आहे. दोघांना भेळ आणि पाणीपुरीचा व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करण्यात आले. केशकर्तनामध्ये प्रवीण असलेल्या एकाला जतमध्ये सलून सुरू करण्यास मदत करण्यात आली. एका मुक्त बांधवाला चप्पल विक्रीचे दुकान सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. – डाॅ. मिलिंद भोई, अध्यक्ष, भोई प्रतिष्ठान