पुणे : पुण्याहून गावी निघालेल्या दुचाकीस्वार आजोबा आणि नऊ वर्षीय नातीचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भोर तालुक्यात घडली. या प्रकरणी डंपर चालका विरुद्ध भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शिवाजी नामदेव शिळीमकर (वय ६९), तन्वी नितीन शिळीमकर (वय ९, दोघे रा. तांभाड, ता. भोर, जि. पुणे ) अशी मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी डंपर चालक आकाश शिवाजी भूषणे (रा. मांजरी, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी सुधाकर शिळीमकर यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी शिळीमकर आणि कुटुंबीय हे सध्या कात्रजमधील आंबेगाव परिसरात राहायला आहेत. शिळीमकर कुटुंबीय मूळचे भोर तालुक्यातील तांभाड गावचे रहिवासी आहेत. शनिवारी (१४ मार्च) दुचाकीस्वार शिवाजी शिळीमकर हे नात तन्वी हिला घेऊन गावी निघाले होते. तांभाड-नसरापूर मार्गावरील देऊळवाडी हातवे परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातात दुचाकीस्वार आजोबा आणि नऊ वर्षीय नातीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तांभाड गावात शोककळा पसरली.

ट्कच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्नपूर्णा गुरु (वय ६४, रा. मोरया सोसायटी, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अन्नपूर्णा यांचा मुलगा अभिजित (वय ३९) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा या १३ मार्च रोजी पुणे-सोलापूर रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी कुंजीरवाडी परिसरात रस्ता ओंलाडणाऱ्या अन्नपूर्णा यांना भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत. शहर परिसरात आठवडाभरात गंभीर स्वरुपाच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.