पुणे : ‘महापारेषण’ कंपनीच्या भोसरी येथील उपकेंद्राच्या वीजयंत्रणेत बिघाड झाल्यामुळे दोन ‘पॉवर ट्रान्सफॉर्मर’ बंद पडले. त्यामुळे गुरुवारी (१५ मे) रात्री नऊ ते अकरापर्यंत भोसरी आणि मोशी परिसरातील सुमारे ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दीड ते दोन तासांपर्यंत खंडित झाला.

‘महापारेषण’च्या भोसरी (आरएस-२) अतिउच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रांमध्ये ५० एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र, वीजयंत्रणेत बिघाड झाल्यामुळे गुरुवारी (दि. १५) रात्री नऊच्या सुमारास दोन्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये ट्रिपिंग आले आणि वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या ८ उपकेंद्रांसह २२ केव्ही क्षमतेच्या १५ वीजवाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला.

त्यामुळे भोसरी, डुडुळगाव, चिखली, घरकुल, मोरेवस्ती, नाशिक हायवे, मोहननगर, जय गणेश साम्राज्य, खडी मशिन, चऱ्होली, अलंकापुरम्, चोविसावाडी, एमआयडीसीतील सेक्टर ७, सेक्टर १०, सेक्टर १२, पीएमएवाय घरकुले आदी परिसरातील सुमारे ८० हजार घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापारेषणकडून तातडीने वीजयंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यात आला. दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर रात्री दहा आणि साडेदहाच्या सुमारास सुरू करण्यात आले. त्यानंतर महावितरणकडून रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.