पुणे : भोंदूगिरीचे अनेक प्रकार उघडकीस येऊनही अशी भोंदूगिरी करणारे आणि त्याला बळी पडणारे, यांची संख्या कमी होत नसल्याचे नुकतेच एका घटनेवरून दिसून येत आहे. पुण्यासारख्या पुढारलेल्या शहरात कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने एका महिलेने ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली आहे.

या प्रकरणी महिलेसह साथीदारांविरुद्ध फसवणूक; तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसरातील रहिवासी आहे. ते बांधकाम ठेकेदार आहेत. समाज माध्यमात त्यांनी या महिलेची गुरुवर्य असे वर्णन असलेली एक चित्रफित पाहिली होती. या चित्रफितीत कौटुंबिक अडचणी, पीडा दूर करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती महिलेने प्रसारित केल्या होत्या.

तक्रारदार डिसेंबर २०२५ मध्ये तिच्या संपर्कात आले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने महिलेने हळदी-कुंकू, बाहुली, दोर तक्रारदाराला पाठवून दिले. त्यानंतर तिने तक्रारदाराला बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरातील घरी बोलावले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखविले, मृत्यूची भीती दाखविली. पीडा दूर करण्यासाठी उतारा टाकावा लागेल, असे सांगून त्याच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन स्वरूपात ४५ हजार रुपये घेतले. तक्रारदाराला जिवे मारणे; तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महिला आणि तिच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करत आहेत.

आर्थिक वादातून तरुणाचा भोसकून खून

आर्थिक वादातून शिवीगाळ केल्याने तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राहुल राजेंद्र जवंजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आशिष डेव्हिड मगर (वय२७, रा. सुभाषनगर, येरवडा) याला अटक करण्यात आली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष अणि राहुल मित्र होते. आशिष ‘डिलिव्हरी बाॅय’ म्हणून काम करतो. आशिष आणि राहुल यांच्यात आर्थिक कारणावरून वाद झाला होता.

चंदननगरमधील बोराटे वस्ती परिसरात ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्या वेळी राहुलने आशिषला आईवरून शिवी दिली. या कारणावरून आशिष चिडला. त्याने त्याच्याकडील चाकूने राहुलवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपीविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुरुवारी (१० सप्टेंबर) गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करत आहेत.