पुणे : दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केल्या प्रकरण बिबवेवाडीतील एका मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला आहे. दहीहंडी उत्सवात कार्यक्रम सादर करताना अश्लील नृत्य प्रकारांना बंदी घालण्यात आली होती. कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती.
या प्रकरणी राधा पाटील (मुंबई), तसेच बिबवेवाडीतील एम्पायर ग्रुपचे अध्यक्ष भूषण अभिमान साेनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर), आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार नंदलाल भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवात एम्पायर ग्रुप ए. के. बाॅईजचे अध्यक्ष भूषण साेनवणे आणि कार्यकर्त्यांनी राधा पाटील यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
परवानगी मिळण्यासाठी मंडळाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर करण्यात आला होता. या अर्जांच्या अनुषंगाने राज्यातील कला, लोककला, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र पोलिसांना सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार कार्यक्रमासाठी परवानगी मिळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करावा लागतो. कार्यक्रमाचे आयोजक, तसेच लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याकडून अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला नव्हता. अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सहायक पोलीस निरीक्षक गरड आणि पथकाने दहीहंडी सोहळा साजरा करणाऱ्या मंडळांना शनिवारी भेट दिली. तेव्हा विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गरड तपास करत आहेत.
