पुणे : महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली.स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

पाटणकर याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद, चैतन्य उर्फ सार्थक शिवपावय, मितेश विनोद माने, सार्थक गावडे, वरद महेंद्र कांबळे, महेंद्र उर्फ वास्को रामचंद्र कांबळे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२५ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पाटणकर आणि त्याचा मित्र महात्मा फुले पेठ परिसरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे फलक लावत होते.

त्या वेळी आरोपींशी पाटणकर आणि त्याचा मित्राचा वाद झाला. आरोपी सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. पाटणकर याच्यावर पिस्तूल रोखून त्याने चाप ओढला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. पाटणकर याच्याबरोबर असलेले मित्र आदित्य, अथर्व आणि आदेश यांना पट्ट्याने मारहाण केले. पाटणकर याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारल्याने तो जखमी झाला.

आरोपींनी पाटणकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना दगड, तसेच बाटल्या फेकून मारल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुरुनुर तपास करत आहेत. चार दिवसांपूर्वी मुंढव्यात पिस्तूल दाखविताना सराइताकडून झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी झाला होता.