पुणे : मंडप साहित्याच्या गोदामात आग लागल्याची घटना बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात मंगळवारी दुपारी घडली. आगीत गोदामातील पडदे, खुर्च्या, बांबू, तसेच अन्य साहित्य जळाले. आगीत गोदामाच्या आवारातील सात दुचाकी आणि एक टेम्पो भस्मसात झाला. अप्पर इंदिरानगर भागातील दाट वस्तीच्या भागात आगीची घटना घडल्यानंतर घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पाऊणतासात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही.

अप्पर इंदिरानगर पीएमपी आगारासमोर काळे अँड सन्स हे मंडप साहित्याचे गोदाम आहे. साधारणपणे आठ हजार चौरस फुटावर हे गोदाम आहे. गोदामात मोठ्या प्रमाणावर कापड, पडदे, खुर्च्या, टेबल, बांबू तसेच अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. मंगळवारी दीडच्या सुमारास मोठ्या प्रमााणावर धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला मिळाली. हा भाग दाट वस्तीचा आहे. आग भडकल्यानंतर मोठा धूर झाला. आगीचे स्वरुप विचारात घेऊन भवानी पेठ, गंगाधाम, कोंढवा, गंगाधाम, एरंडवणे अग्निशमन केंद्रातील दहा बंब, नऊ टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, सहायक अधिकारी विजय भिलारे, केंद्रप्रमुख समीर शेख, सुनील नाईकनवरे, कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० जवानांनी पाण्याचा मारा करुन पाऊण तासात आग आटोक्यात आणली. दुपारी तीनच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आली.

गोदमाच्या आवारात लावलेल्या सात दुचाकी, एक टेम्पो आगीत जळाला, तसेच मंडप साहित्य भस्मसात झाले. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

अप्पर इंदिरानगर भागात दाट वस्ती आहे. या भागात दाटीवाटीने घरे आहेत. मंडप साहित्याच्या गोदामाला मंगळवारी दुपारी आग लागली. आगीचे स्वरुप, तसेच संभाव्य दुर्घटना विचारात घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दाट वस्तीत आग पसरू दिली नाही. जवानांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले, तसेच संभाव्य दुर्घटना टळली. – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी,