पुणे : शहरात अपघातांचे सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या अपघातांमध्ये नुकताच पाच जणांचा मृत्यू झाला. टिळक रस्त्यावर रवींद्र अनंत जोशी (वय ८०, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांचा मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला. याबाबत जोशी यांचा मुलगा रोहित (वय ५३) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हे १६ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास टिळक रस्त्यावरून दुचाकीवरून निघाले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेले जोशी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भंडारे तपास करत आहेत.

कुडजेजवळ अपघात

उत्तमनगर-खडकवासला रस्त्यावरील कुडजे गावाजवळ भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विवेक विनोद मोहरीर (वय ४४) असे मृत्यमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी शीतल (वय ४२, रा. गावकूस रिसॉर्ट, जांभळी, सांगरुण, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक २९ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीवरून निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने विवेक यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक पालवे तपास करत आहेत.

दोन दुचाकींची धडक

दुचाकीच्या धडकेत अन्य दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खडकवासला भागात नुकतीच घडली. मोहम्मद गुलजार सिद्दिकी (वय ४७, रा. उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत सिद्दिकी यांचे चुलत बंधू सिंकदर शफी सिद्दिकी (वय ६४) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मोहम्मद सिद्दिकी २४ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास खडकवासला परिसरातून निघाले होते. स्मशानभूमीजवळील अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने मोहम्मद यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस फौजदार भापकर तपास करत आहेत.

अल्पवयीन दुचाकीस्वाराचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे भागात घडली. सुमित राजेश राठोड (वय १७, रा. अभिनव काॅलेजजवळ, नऱ्हे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राठोड याची आई अनसूया (वय ४२) यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वाहनचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार सुमित ११ जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास नऱ्हे परिसरातून निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार सुमीतला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी वाहनचालक, तसेच सुमित अल्पवयीन असताना त्याला दुचाकी वापरास देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिरकुळे तपास करत आहेत.

अवजड वाहनाची धडक

जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी चौकात अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. अनिल लक्ष्मण वाघमारे (वय ४५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांची पत्नी सुशिला (वय ४२) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार अनिल वाघमारे १६ जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बोपोडी चौकातून निघाले होते. त्या वेळी अवजड वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अवजड वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गालफाडे तपास करत आहेत.