मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी कुटुंबीयांना एक कोटी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले. शिवाजीनगर न्यायालयात पार पडलेल्या लोकअदालतीत तडजोडीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर, ॲड. अतुल गुंजाळ आणि ॲड. सुभाष किवडे यांच्या पॅनेलसमोर ही तडजोड झाली. अर्जदारांचे वकील ॲड. आर.एम.पवार, ॲड. बी.एस.पुजारी, विमा कंपनीच्या वतीने ॲड. सुनील द्रविड, ॲड.पूजा पवार, ॲड स्वप्नील पिंपळघरे यांनी तडजोडीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दुचाकीस्वार गणेश अशोक माने (वय ३९) यांचा मोटारीच्या धडकेने मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि वृद्ध आई असा परिवार आहे. माने कुटुंबीयांनी ॲड. पवार आणि ॲड. पवार यांच्या मार्फत खासगी विमा कंपनीच्या विरोधात दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असा दावा मोटार अपघात न्यायप्राधिकरणात दाखल केला होता.




दुचाकीस्वार माने मार्च २०२१ मध्ये चिंचवडहून निगडीकडे जात होते. त्या वेळी चिंतामणी चौकात त्यांना भरधाव मोटारीने धडक दिली होती. उपचारादरम्यान त्यांचा खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. माने एका खासगी कंपनीत कामाला होते. त्यांना मासिक वेतन ७२ हजार रुपये मिळत होते. त्यांचे वय, उत्पन्न आणि अवलंबून असलेल्या कुटुंबीयांचा विचार करुन नुकसान भरपाईची मागणी माने कुटुंबीयांच्या वकिलांनी केली. विमा कंपनीकडून तडजोडीत नुकसान भरपाई देण्याचे मान्य करण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी माने कुटुंबीयांना धनादेश दिला.